शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

संत फोटो ऑपरेशन






एका संताच्या देहावर
दुसऱ्याचे चित्र चिटकवून
नकळे काय साधतात हे
तथाकथित भक्तजन
दत्ताच्या मूर्तीवर साईचे रोपण
तेही तीन शीर लावून
अन श्रीपादांच्या कपड्यात
स्वामी समर्थांना कोंबून
सिध्द करतात त्यांची एकरूपता
या भोंगळ प्रदर्शनातून
अरे बाबांनो
ते म्हणजे त्याचे तत्व
तेवढेच ठेवा हृदयी धरून
अहो आता तुम्हाला
फोटो शॉप येते
कोरल जमते
आले हो आम्हाला कळून
तुमच्या घरी असतील ना
खूप कुणाचे फोटो
आता आदरार्थी लोक द्या सोडून  
काका मामा ही टाका वगळून
मित्र मैत्रिणी लांबचे कुणी
अनोळखी जगाच्या कोपऱ्यातील
घ्या नेमके निडून
नाही म्हणजे माझा फोटोही घ्या हवातर
अगदी खाली नाव विक्रांत लिहून
अन करा त्याचे विच्छेदन
हवे ते हवे तसे करून
पण हा देवावरचे अन संतावारचे
प्रकार आणि प्रयोग द्या सोडून
ते जसे दिसतात ना
तसेच फार छान दिसतात
तसेच आहेत मनात घर करून
असेल तुमचीही श्रद्धा त्यांच्यावर
नाही असे नाही पण
तुम्हाला खरच वाटत नाही का
विटंबना करतो तयाची आपण
सुज्ञ आहात आपण
सुजाण आहात आपण
माझी विनंती घ्या समजून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




सत्याचा स्पर्श






असं म्हणतात
एकदा सत्याचा स्पर्श
जीवनाला झाला की
तुम्ही तेच राहत नाही

तो स्पर्श असू शकतो
कुण्या येशूचा,मोझेसचा
कुण्या बुद्धाचा,महावीराचा
कुण्या कृष्णाचा,दत्ताचा
त्या स्पर्शाने बदलतात
परिमाणे जीवनाची
सुखाची यशाची प्राप्तीची

मन जणू अवधूत होते
अन दिगंबर वृत्तीने
सारे जग कवेत घेते
जिथे असेल तिथे
विमुक्त जगणे असते ते
जीवनाच्या लहरीवर
दैववशे वाहणे असते

सर्व इच्छा कामना स्वप्न
पडतात गळून
पिवळ्या पानागत
कुठल्याही वेदनेवाचून

लक्ष्यावधी जन 
हात उभारून
उभे आहेत इथे
मी ही त्या गर्दीचा 
एक भाग होवून 
पण तो स्पर्श अजून
उमलत नाही आतून
कदाचित
श्रद्धेचे बळ कमी पडत असावे म्हणून 
वा निकडीच्या चवड्यावर
उभे राहता येत नसावे म्हणून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने 
http://kavitesathikavita.blogspot.in







बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

शव जातेय वाहुनी…..





मनी व्यथा दाटलेली 
ही कालच्या कथेची
का काचते अजुनीही 
मज रात्र चांदण्याची

जरी सोडले सारेच 
मी अहंकारा पोटी
जय मानतो बळेच  
ही वल्गनाच रिती 

त्या रोजच्या वेदनेला 
बांधून घेतले उरी  
वधी जाणाऱ्या पशुस 
यातना होतेच तरी  

उरी वाहावे कशाला      
शूळ उगा असे किती  
दे झुगारुनी जग नि 
जड झाली जीर्ण कुडी

भय जगण्याचे मनी 
मरणाचे जात नाही 
सुख देहास इवले 
का या सोडवत नाही  

सरली रात्र रोजची 
दिन सरला काही  
हिशोब काहीच मनी 
पण या उरला नाही

शव जातेय वाहुनी 
दूर गंगेच्या प्रवाही
मोक्ष असेल मिळाला 
किंवा खोटा दिलासाही 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

शब्दातला दत्त



शब्दातला दत्त
यावा स्पंदनात
वृती चाकाटत
हरवाव्या ||

सगुणी सजला
दिसो हृदयात
सरो वहिवाट
सोवळ्याचा ||

जगाआड दडो
डोळ्यातील भक्ती
अंतरीच्या ज्योती
पाजळून ||

मनाच्या एकांती
शून्याचा शेजार
दत्त दिगंबर
मीच व्हावा ||

विक्रांत मागतो
विरळे मागणे
संताचे सांगणे
जाणुनिया ||

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




डबके




कधी कधी जगतांना  
सन्मानाचे ओझे होते
मातीमध्ये साचुनिया  
पाण्याचे डबके होते

सदाकदा वाहायचे
वेड जरी असे कुणा
सरलेल्या उताराचे
दैव ओहाळाचे होते

विश्व पेटवूनी सारे
कुडा जाळण्याची वांछा
धरण्याचे धैर्य कधी
ओघळून दूर जाते

डोळे मिटूनिया व्यर्थ  
स्वप्न मनात जागले  
झगमगतो हा चंद्र
रात्र तरीही दाटते  

खूळ जीवनाचे आले
सारे कळून विक्रांता   
जाता विझून निखारे
राख मागुती उरते


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





रविवार, २५ डिसेंबर, २०१६

मेळावा ... (ठाणे महायोग शिबिर 25 डिसेम्बर 2016)





जाहला सोहळा
भक्तांचा मेळावा
जीवाला जोडला
अर्थ काही ||

आले भाग्यवंत
कृपेचे पाईक
झाली सोयरिक
गुरुपदी  ||

आले गेले किती
हिशोब कशाचा
पत्ता न तयाचा
बिचारे ते ||

सारे होवो सुखी
जगी सिद्ध मुनी
लागुनी साधनी
महायोगी ||

इतुकीच वांच्छा
सद्गुरू ठेवी
तयाची घडावी
पराकाष्ठा ||

बाकी ज्याचे त्याचे
प्रारब्धे घडते
भाग्य ओघळते
प्रभू कृपे ||

देवा दिली संधी
गुरु कार्यासाठी  
थोर उपलब्धी
पामरा या ||

होवो केरसुणी
त्यांच्या मी हाती
कामना विक्रांती
सदा असे   ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




गोंदवलेकर महाराज …




सत्य  प्रसवते। ते ब्रह्म नांदते ,
या इथे भेटते । गोंदवले।

शब्दच पण तें ।अर्थ दाटले,
नसती इथले।काल स्पर्शी।।

इतुके प्रेमळ । भेदक कोवळं
हृदया जवळ । स्थान जया।।

आम्ही मानले । आमुचे म्हटले 
अजुनी जाहले ।नाही माझे ।।

असे अभागी । कपाळ करंटा 
तव दारवठा ।याचक मी ।।

सरली शक्ती । नाम न ओठी 
करितो भक्ती।तरी बळे।।

गेला तर हा । जन्म जाऊ दे
स्मरण राहू दे । माझे तुला।।

कधीतरी मग । या अंधारातून
घेई ओढून । तुझ्याकडे।।

स्मरतो विक्रांत ।प्रेमे तुजला ।
कृतार्थ जाहला ।शब्द कृपे ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने



मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...