मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

ज्ञानदेव

  ज्ञानदेव माझा
*********
प्राणाचा या प्राण माझा ज्ञानदेव 
प्रभू गुरुदेव कृपाळूवा ॥१
जीवाची पालक माऊली प्रेमळ 
प्रेमच केवळ मूर्त रूप ॥२
तयाच्या बोधात जगतो वाढतो 
अंगणी खेळतो सुखाने मी ॥३
कधी भटकतो आणि परततो 
सदा स्वागता तो उभा दारी ॥४
चुकतो माकतो कधी वाहवतो 
तोचि सांभाळतो धाव घेत ॥५
पुन्हा पुन्हा सांगे अर्थ जीवनाचा 
मार्ग जगण्याचा नीट मज ॥६
विक्रांते पायाशी घेतला विसावा 
नको नाव गावा धाडू आता. ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

आळंदी जाऊन

आळंदी जाऊन
***********
आळंदी जाऊन होई रे पावन 
जन्माचे कल्याण घडे तिथे ॥१

तया पायरीशी घाली लोटांगण 
भक्तांची चरण धूळ घेत ॥२

राम कृष्ण हरी घोषात रंगून 
देवाला पाहून घे अंतरी ॥३

तया चैतन्याचे चांदणे सुखाचे 
थेंब अमृताचे चाख जरा ॥४

विक्रांत मागणे फार काही नाही 
सदा चित्त पायी राहो देवा ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

पसारा

पसारा 
******
म्हणतो जाईल मी हा सोडूनिया पसारा 
पण काय भोवताली जमेल नवा पसारा 

या फांद्या जीवनाच्या का जीवनास आटोपेना
व्यापूनिया आसमंत दिसतो सर्व पसारा 

जी हवी ती दिशा या वृक्षास सापडेना 
अडवतो प्रकाशास घनदाट तो पसारा 

हाती न येती चांदणे पसरून दोन्ही करा 
जे भेटते न कधी ते असते काय पसारा 

ओझे हवे पणाचे हे उपजे कुण्या मातीत
उगवून मातीतून जातो मातीत पसारा 

जो उधळतो फुले तो असे काय फुलांचा
तो रंगही जीवनाचा होतोच ना पसारा 

होतोच जन्म शेवटी  हा कोपऱ्यात पसारा
विचारतो कुणी काय कुठे गेला रे पसारा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

जाणे

जाणे
*****
तुझे आकाशाचे नाते 
तुज कळत का नाही 
तुझे धरित्रीचे मूळ 
तुज दिसत का नाही ॥

नादी लागून वाऱ्याच्या 
भरकटतो सारखा 
जग घालून जन्माला 
का रे त्यात तू परका ॥

लाख सवंगडी तरी 
जन्म विराण एकटा 
हात सोडवून दूर 
नेती प्रवाहाच्या वाटा ॥

जन्मा आधीचा एकांत 
गुज सांगतो कानात 
झाले खेळणे बहुत 
येणे परत घरात ॥

रंग अवधूत तोच
वाट पाहतो शून्यात 
गजबजाट जगाचा 
आता हरपो वाऱ्यात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 


गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

काय असे ते

काय असे ते
*********
देहात वाहते मी पणे नांदते 
तुजला कळते रे काय असे ते ॥

भ्रमात जगते मोहात फसते 
मिटून ही जाते रे काय असे ते ॥

दुःखाच्या डोहात आशेच्या लाटात
स्वतःला शोधते रे काय असते ते ॥

कळल्या वाचून जीवन चालते 
तयाला पाहते रे काय असे ते ॥

जळल्या वाचून ज्योत जी पेटते 
तयात जळते रे काय असे ते ॥

विक्रांत शोधतो सर्वत्र धावतो 
निवांत राहतो रे काय असते ते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५

जगत

जगत
******
माझिया मनात घडो तुझा वास 
सरो जड भास जगताचा ॥

माझिया कानात पडो तुझे शब्द 
नको व्यर्थ वाद जगताचे ॥ .

माझिया स्मरणी राहा निरंतर 
घडू दे वावर मग जगी ॥

अगा हे जगत मनाचे वर्तुळ 
घडावा समूळ नाश याचा ॥

विक्रांत फिरला जगी भवंडला 
तुज कळवळा येवो दत्ता ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

किन्नर(अनुवाद)

 


किन्नर(अनुवाद)

*****

कुणी म्हणतात  

ते आळशी असतात पुरुषागत

अथवा शोषित स्त्रीयांगत

आरसा पाहून हरखून जातात 

पण जिवलग मरताच ते

दु:खात डूबतात 

अन डोळ्यात त्यांच्या चमकतात 

तीच सुखाचे आसवे प्रेम मिळताच

दिलदार असतात ते

अन व्यवहारीही


किन्नर वेगळे असतात 

असे कुणी म्हणतात

पण लुटारू तर 

त्यांनाही ठार मारतात
.

(कवि ब्रज श्रीवास्तव)

अनुवादक डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे 

 

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...