बुधवार, ३० एप्रिल, २०२५

जस्सी सिस्टर


जस्सी सिस्टर( निवृत्तीदिना निमित्त)
**********
जस्सी सिस्टर बद्दल बोलायचे तर 
त्या सुद्धा कॉटर्समध्येच राहायच्या 
त्यांची मुलं आमच्या डोळ्यासमोरच 
दुडू दुडू धावायची मस्ती करायची 
आणि पाहता पाहता 
शाळेत कॉलेजमध्ये जाऊन शिक्षणाच्या 
अंतिम टप्प्यात ही पोचली आहेत .
काही जीवनात स्थिरावली आहेत .

तर आम्ही जेस्सी सिस्टरांचा संसार 
फार जवळून पाहिला आहे .
त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप लिहू शकतो 
पण  लिहिण्यालाही मर्यादा आहेत .

फार वर्षांपूर्वी टीव्ही वरती 
एक सिरीयल यायली जस्सी जैसी कोई नही .
आम्ही बऱ्याच वेळेला जेसीला 
मजे मजेत तसे बोलायचो सुद्धा .
पण त्या मजे मागे सुद्धा सत्य लपलेलं होतं 
ते आम्हाला कळत होतं .

सिस्टराचे मिस्टर परदेशामध्ये नोकरीत असायचे
त्यामुळे संसाराची जबाबदारी ,सारा डोलारा 
त्यांनी एक खांबी तंबू प्रमाणे सांभाळला होता*१

म्हणूनच त्यांच्यातील मायाळूपणा आणि 
कडकपणा हा एकाच वेळेला दिसून येई 
पण मुळात त्यांच्या स्वभाव कडक मुळीच नाही
 कारण तोडून बोलणे चिडणे कुणाला दुःख देणे 
हे त्यांच्या स्वभावातच नाही 

त्यामुळे कुणाचा खूप राग आला तर
त्यांची चिडचिड व्हायची खरी 
अन  त्या वैतागायच्या सुद्धा 
पण त्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे 
बोलू जावू शकत नव्हत्या
अर्थात मग आमच्याकडे तक्रार घेऊन यायच्या 
आणि आम्ही आमच्या परीने 
त्या व्यक्तीला समज देऊन .
त्यांना त्यांचे समाधान करून 
ते प्रकरण छान पैकी मिटवून टाकायचो.

सिस्टर अतिशय बोलक्या आहेत 
त्याचे मराठी सुद्धा खूप छान आहे
तरीही त्यांना मराठी परीक्षे त्रास दिलाच . .

तर त्यांची छोटी मुलगी 
ते  तिला  किंगणी म्हणायच्या
ती शाळेच्या पहिल्या दिवशी हरवली .
हरवली म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये 
ती घरी यायला निघाली आणि कुठेतरी पोचली *
तिच्या या पराक्रमाचे वर्णन 
सीस्टराकडून कितीतरी वेळा ऐकले
आणि प्रत्येक वेळा ते एन्जॉय केले
आणि याशिवाय जीवनातील 
खूप घटना,संकटे ,प्रसंग याचे वर्णन त्या करीत.
ती त्यांची कथा कथन शैली खूपच छान आहे .

त्यांनी घरासाठी मुलींसाठी उचललेले कष्ट 
केलेली धावपळ आणि मुलींचे शिक्षण 
पार पडण्यासाठी केलेल्या लटपटी खटपटी
आम्ही फार जवळून पाहिल्या आहेत .
म्हणूनच आम्ही शंभर टक्के  म्हणू शकतो की 
त्या अतिशय ग्रेट आहेत .
म्हणजेच  जस्सी  जैसी कोई नही 

मध्यंतरीच्या काळात त्यांना स्पाईनच्या आजाराने 
दिलेल्या त्रास आम्हाला आठवतोय 
पण त्यातून ज्या खंबीरपणे आणि हिम्मतीने
त्या बाहेर पडल्या त्यावरून 
त्यांच्या स्वभावातील निग्रह जाणून येतो 

आजकाल महानगरपालिकेमध्ये 
दक्षिणे भारतातून  फारशा स्टाफ नर्सेस '
भरती होत नाहीत .
काही कारण असेल त्यात आपण पडत नाही .
पण त्यामुळे साउथ इंडियन सिस्टरांचे*
जे एक स्वभाव वैशिष्ट्य असते
रुग्ण हाताळण्याची पद्धत  असते
सहकाऱ्यांबरोबर वागायची पद्धत असते
ती आम्ही नेहमीच मिस करतो 

किंबहुना त्या जनरेशन मधील काही शेवटच्या 
दुव्या मधील, जस्सी सिस्टर  आहेत 
त्यांच्याबरोबर आम्हा काम करायला मिळालं
त्याबद्दल आम्ही आम्हाला भाग्यवान मानतो .
तर आता हा दुवा , 
आपल्या लाडक्या सिस्टर आता निवृत्त होत आहेत *
निवृत्ती पश्चात त्यांना सुख समाधान 
आनंदी निरोगी जीवन लाभो हीच प्रार्थना .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

किशोर पाटोळे

किशोर पाटोळे  (निवृतिदिना निमित्त)
**"****
जांभळाचे पूर्णपणे 
पाने गळून गेलेले झाड 
कधी कोणी पाहिले आहे का ?
अर्थात कोणीच नाही.
त्याला एक वरदान आहे 
हरितपर्णाचे सदा हिरवे राहायचे

पाटोळे ना पाहिले की मला तो
हिरवागार बहलेला जांभूळ आठवतो .
गेली वीस पंचवीस वर्षे 
मी पाटोळे यांना पाहतो आहे 
पण पाटोळे आहे तसेच आहेत
काहीच फरक पडला नाही
ते तेव्हा जसे दिसायचे 
तसेच आताही दिसतात .

पाटोळे राहायचे 
आपल्या हॉस्पिटलच्या कॉटर्समध्ये 
आणि त्याच्या तळ मजलावर
आमची ए मो रूम होती .
त्यामुळे  पाटोळ्यांची व फॅमिलीची
रोजच भेट गाठ व्हायची.

या हरितपर्णी झाडाचं फुलणे बहरणे 
आणि विस्तारणे आम्ही पाहिले आहे .
त्यांचा स्वभाव सुद्धा त्या पिकलेल्या जांभळासारखा मधुर मृदू 
आणि हवाहवासा वाटणारा आहे
आणि आपली स्मृती मागे ठेवणारा .
जसा तो जांभूळ ठेवतो 
जिभेवर आणि हातावर 

नाकासमोर पाहून चालणारा 
आणि जगणारा माणूस जर 
कुणाला पाहायचा असेल तर 
मी पाटोळ्या कडे बोट दाखवीन 
हा माणूस खरच एक आदर्श पती 
पिता आणि कर्मचारी आहेत.

एक्स रे डिपार्टमेंटच्या बाबतीत म्हणाल तर 
मला तांबे आणि पाटोळे यासारखी
खूप सुंदर माणसं मिळाली इथे
त्यामुळे या डिपार्टमेंटचे टेन्शन 
सिएमो  असताना मला कधीच नव्हते
कुठले ही मशीन बंद पडले 
सीआर काम करायचा थांबला 
किंवा स्क्रू खाली पडले पाणी साठले 
A C आवाज करायला लागला . 
किंवा हालायला लागला 

तर ही गोष्ट माझ्या कानावर यायच्या अगोदर
 त्या टेक्निशियन पर्यंत पोचलेली असायची 
आणि तो टेक्निशियन कधी येणार 
काय करेल हे ही आम्हाला सांगितले जायचे .

तसे पाटोळे घरादारात व मुलाबाळात रमणारा 
आनंदाने संसार करणारा अष्टपैलू संसारी माणूस

 व त्याही पलीकडे त्यांचे 
आणखी एक व्यक्तिमत्त्व आहे 
जे मला सतत जाणवायचे 
पण कळायचे नाही पण पुढे जेव्हा  त्यांनी 
अनिरुद्ध बापूचा पंथ पत्करला 
आणि आपली श्रद्धा त्यांच्यावर ठेवून 
अध्यात्मिक मार्गक्रमण सुरू केले 
त्यावेळेला त्यांच्यातील ते 
मी शोधत असलेले वेगळेपण मला कळले .
त्यांनी आपलं संसार अतिशय नीट ठरवून 
विचारपूर्वक केलेला आहे 
त्यात मुलांचे शिक्षण असो .
कॉटर्समध्ये राहायचा निर्णय असो 
किंवा नंतर भाड्याने घर घेऊन 
जवळच राहायचा निर्णय असो .
त्यांच्या त्या निर्णयामुळे त्यांचा संसार व
नोकरीसुद्धा सोन्यासारखी झाली आहेत.

माझ्यासाठी  तर पाटोळे हाच
सोन्यासारखाच माणूस आहेत .
नम्र वागणे सौम्य बोलणे.
सगळ्या बरोबर स्नेहाचे संबंध असणे. 
सगळ्यांना सांभाळून घेणे. 
जिओ और जिने दो. 
किंवा एकमेका सहाय्य करू .
हे तत्व त्यांनी नीटसपणे सांभाळले

असे अनेक गुण त्यांच्यात आहेत.
वेळ कमी पडेल बोलता बोलता.
तर हा सोन्यासारखा माणूसाला 
आपण निवृती निरोप देत आहोत .
त्यांचे उर्वरित जीवन सुखी समाधानी आनंदी 
निरोगी जावो हीच प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

नित्य निरंजन

नित्य निरंजन
***********
तन हलते अन्  मन डोलते 
दत्त नाम हळू मनी उमटते 
द्राम द्राम ध्वनीने जग भरते
वीज हृदयाच्या आत नाचते 

कडकड डमडम एक नाद 
राहे उमटत उरी पडसाद 
रंध्रारंध्रा मधून शब्द उमटतो 
दत्त दत्त हाच करीत निनाद 

माथ्यावरती गिरनार हलतो 
येई कृष्णा पूर अन् हृदयात 
रोम रोमा मध्ये फुले औदुंबर 
दिव्य दरवळ भरतो नभात 

उघडून दिठी नाही उघडत
बाप भेटतो आत कळतो 
ताप सरतो व्याप हरतो 
नित्य निरंजन आत तेवतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २७ एप्रिल, २०२५

मागणे

मागणे
******
आकाश रक्त मागत आहे 
धरती रक्त मागत आहे 
पुसलेल्या भाळा वरचा
ठिपका रक्त मागत आहे ॥

मना मनातील आक्रोश 
पेटून तप्त होत आहे
जळो लंका रावणाची 
हेच मागणे मागत आहे ॥

व्हावा प्रहार शेवटचाच
शस्त्रही  सरसावत आहे 
बळी पडावे न निष्पाप 
हाच न्याय मागत आहे ॥

नकोच साखर पेरणी ती 
सहानभूती निरर्थ आहे 
अस्तनीतील साप सारे 
एकेक आता दिसत आहे ॥

घे नरसिंहाचे उग्र रूप ते
वाट तुझीच पाहत आहे 
उंबरठयावर देश घराच्या
कृत्य कराळ मागत आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २६ एप्रिल, २०२५

स्वामी समर्था

स्वामी समर्था
***********
मज बोलवा हो स्वामी
तुमच्या दिव्य गावाला 
मज दाखवा समर्था
तुमच्या भव्य रूपाला ॥
महाकाय गौरवर्ण 
अजानुबाहू प्रेमळ 
तेज सूर्याचे तरीही 
चंद्राहून ते शीतळ ॥
पाहीले जे अंतरात
डोळा दिसो एकवार 
आश्वासक तव स्वर 
अन पडो कानावर ॥
जाणतो मी हे दयाळा 
तुम्हीच माझा आधार
येवुनिया एकवार
हात ठेवा डोईवर  ॥
तुम्हाकडे भक्तीविन
मागणे ते आन नाही 
राहावा तुमचाच मी
हेच स्वप्न नित्य पाही ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

साक्षीदार


साक्षीदार
********
अनंत असतो प्रवास जीवाचा
मातीत रुजून अपार व्हायचा ॥१

नव्या रुजण्यात म्हणते जीवन
नव्या उमेदी मी आकाश होईन ॥२

घडते फुलणे घडते फळणे
कणकणात ये सजून जगणे ॥३

पण अवघ्याचा पडतो विसर 
वठणे जोवर न ये अंगावर ॥४

आकाश असते मग्न आकाशात
माती ही असते धन्य आपल्यात ॥५

काळपटावर नाटक घडते
युग साक्षीदार पान उलटते ॥६

घडते वठणे घडते जळणे 
अस्तित्वाचा अन अर्थ हरवणे ॥७

पानोपानी जरी तीच कहाणी
नाटक रंगते नवीन पात्रांनी ॥८
 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

दहशदवाद

दहशतवाद 
*********
मान्य आहे दहशतवादाला धर्म नसतो 
हेही तेवढेच सत्य आहे की
धर्मातच दहशतवाद जन्माला येतो 

तीच तीच नावे तेच तेच नारे 
तेच तेच झेंडे ते तसेच अजंडे 

असे का होते ?
जसे बीज तसेच पीक येते !
त्याला पर्याय नाही का ?

शेवटी धर्म म्हणजे तरी काय आहे 
मेंदूत घातलेले सॉफ्टवेअर आहे 
ज्याला जे सॉफ्टवेअर मिळते 
तसेच तो मेंदू ते यंत्र चालते

पण दुर्दैवाने त्या जुन्या सॉफ्टवेअरचे 
अपडेटेशन होत नाही 
ते अपडेट झाले की कदाचित 
कदाचित काही मूळ प्रश्न मिटतील ही

पण ते होत नाही
त्या सॉफ्टवेअर वर ते हक्क  ठेवणारे
ती प्रथा सातत्य ठेवणारे 
स्वार्थी मालक तथाकथित मालक 
वंशपरंपरागत मालक 
ते तसे होऊ देत नाहीत 

म्हणूनच तीच ती डिफेक्टिव 
कालबाह्य यंत्र येतच राहतात 
आणि सगळ्या जगाला 
क्लेश देतच राहतात .
अन उध्वस्त करत राहतात हे
नवे सर्जनशील सुंदर जग .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...