रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

दारात

दारात
****
तुझ्याच कृपेने जळेल वासना 
सांभाळ सावर मज दत्त राणा ॥१

जुनाट घोंगडे क्षणात जळेन 
मग ते भस्म मी तुजला वाहीन ॥२

फारच कठीण मनाचे वळण 
जिंकलो म्हणता पडे आदळून ॥३

परंतु शेवटी तुझाच आधार 
करुनी परीक्षा लावीशी तू पार ॥४

त्याच त्या दारात विक्रांत अजून 
घे रे घ्यायचे ते देवा तू छळून ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

उमेश देशपांडे

डॉ.उमेश देशपांडे 
**********
मला वाटते उमेश देशपांडे हे एक नाव नाही
 एक व्यक्ती नाही 
तो एक जीवन जगायचा एटीट्यूड आहे 
जीवन आनंदाने जगायचे 
आणि आपला सभावताल आनंदमय करून टाकायचा .
जीवनाचे ओझे न मानता 
तो एक आनंदाचा प्रवास मानायचा .
हि एक अतिशय दुर्मिळ वृत्ती आहे .

आता जीवन म्हटले की 
सुखदुःख चढउतार हारजीत ही येणारच 
देवालाही ते चुकले नाही 
पण त्या साऱ्यावर वरचढ होत 
आपल्या जगण्याचे सूत्र न विसरता 
आपले सूर न बिघडवता 
जीवन जगत आला आहे उमेश 

उमेश चा स्वभाव मिश्किल हसरा बोलका 
एकूणच हवा हवा वाटणारा 
काटे तर गुलाबालाही असतात 
पण ते थोडेच कोणी पाहतात 
तसे उमेश मधील कुठल्या कमतरता 
आम्हाला दिसल्याच नाहीत 
दिसल्या तरी जाणवल्या नाहीत 
आणि जाणवल्या तरी आम्ही 
त्या पाहिल्याच नाहीत 
कारण आमचे लक्ष गुलाबतील सुगंधाकडे होते 

इथे जमलेले लोक फारच कमी वाटावेत
इतकी मित्र मैत्रिणीची धनदौलत त्यांनी कमावली आहे 
जो मित्र जमवतो तोच खरा श्रीमंत असतो
त्या अर्थाने तो कोट्याधीश आहे 
तो आणखीन एक अर्थाने कोट्याधीश आहे 
त्याला शब्द त्याचा सूक्ष्म अर्थ 
आणि अन्वर्थ याचे सूक्ष्मज्ञान आहे 
त्यामुळे शब्दात वाक्यात तो सहजच कोटी करू शकतो 
आणि असंख्य हास्याचे तुषार 
आपल्या भोवती पसरवत असतो 

तो एक परफेक्ट आणि बिनधास्त डॉक्टर आहे
इतका की केवळ पॅरा सिपियम बीसीवर 
पूर्ण ओपडी चालवू शकतो 
आणि मेंढराच्या कळपातून लांडगा शोधून काढावा 
तसा सिरीयस पेशंट अचूक शोधून काढतो 

त्याचे स्वरावरील आणि गाण्यावरील प्रेमही सर्वश्रुत आहे .
त्याची अनेक गाणीही आपण ऐकली आहेत .
त्याचे सारे जीवनच आनंदाचे गाणे आहे .

माझ्या सर्व मित्रात सर्वात 
सुखी समाधानी आनंदी मित्र कोण असेल 
असे विचारल तर मी उमेश चे नाव घेईल 
तो ते वरदानच घेऊन आला आहे 
ते वरदान त्याच्यावर असेच बरसत राहो
हीच परमेश्वराकडे प्रार्थना 
त्याला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो ही सदिच्छा .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

झिंग

झिंग
*****
चुकार डोळे गर्द सावळे 
नच कळती रे कुठे गुंतले

यंत्र हातात गुपित ओठात 
कोण चालले शोधत एकांत 

आणिक चाहूल लागता जरा 
का गोरामोरा तो होय चेहरा 

मग वळून दिशा बदलून
जातेय कोण नजर चोरून 

तरीही कळते कळणाऱ्याला 
मीन लागला कुण्या गळाला

गळ कुणाचा घास कशाचा 
शोध कुणा का उचापतीचा 

धूर्त मासळी मृदू गोरटी 
करते जे ते सारे जाणती

जा बाई तव घे आमिषाला 
मेख  त्यातली ठावुक तुजला

भीती सोडता रित मोडता
प्रीती रंगून ये तव हाता

असो खरी वा उगाच खोटी 
झिंग आणते  मदिरा ओठी
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

चित्र

चित्र
****
पुन्हा तुझे चित्र दिसे पानावर 
पुन्हा एक हास्य आले ओठावर 

पुन्हा एक श्वास झाला खालीवर 
पुन्हा एक तार तुटे विणेवर 

तो ही एक नाद झणाणे कंपण 
मनी अचानक आठवले स्वप्न 

उगा उगवले तुझे वेडेपण
आकाश झालेले धुंद माझेपण 

जाहला हिंदोळा पाण्यात लहर 
अदृश्य वलय गेली खोलवर 

हिशोबी आठव मग जगताची 
अन मोडलेली घडी दो देहाची 

अवघे व्याकुळ तरीही सुंदर 
उलटले पान पुन्हा पानावर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

भाग्यवान


भाग्यवान
********
सुटूनिया लोभ भय हरवावे 
सुखही कळावे मोहमयी ॥१

चालावे उदास कळून जीवास 
सांडून सायास सुरक्षेचे ॥२

हवाय कुणाला जमीन जुमला 
बॅलन्सी भरला वेडेपणा ॥३

शून्यात उगम शून्यात मुक्काम 
शून्यात विराम ठरलेला ॥४

सारूनी पडदा मजलागी दत्त 
सदा दावी तथ्य पुन्हा पुन्हा ॥५

विक्रांत भाग्याचा दत्ताने धरला
जगाचा सुटला बंदीवास ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

यमुना

यमुना 
*****
अव्यक्त यमुना तव डोळ्यातील 
ओढून मजला नेते दूरवर 

संभ्रम किंचित वेडी हुरहूर 
दिसे खिन्नता डोही खोलवर

मावळतीचा तो चंद्र धूसर 
घेऊन येतो उरात काहूर

हे तर घडले होते घडणार 
अटळ लिखित काळ पटावर 

नकोस शोधुस पुन्हा तीरावर 
पाऊल उठली मृदू वाळूवर 

पण विरहाची नको हळहळ
हि युगे इवली इवले अंतर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 
 

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

वांच्छा

वांच्छा
******
या मनीचे हळू सांगतो 
आई तुझ्या मी कानात 
घे बांधुनी गाठोडे हे 
ठेव तुझ्या फडताळात 

फार काही भार नाही 
अडगळ थोडी होईल ही 
पायाखाली ठेव हवे तर 
भाग्य पदरी पडो ते ही 

घे  क्षणभर  उशाला वा
आसन करून  बसायाला 
तव कारणे देह पडावा 
आशिष देई या जन्माला 

कर पोतेरे सदनामधले 
देई दास्य घर पुसायला 
मी फक्त तुझाच व्हावा 
अन्य नसे वांच्छा मजला 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...