रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

धूळ पाटी

धूळ पाटी 
*******
प्रश्न हे तुझेच जीवना 
अन उत्तरेही तूच दिलेली 
धूळपाटी हे जगणे माझे 
ठाऊक नच  कधी पुसली ॥

परि कणां ही असे स्मृती 
इवली इवली विखुरलेली 
त्या कणांचे क्षण कवडसे 
खोलवर मज दिसती दबली ॥

त्या क्षणांना भानही नसते 
स्वप्न उमटली तुटली फुटली 
कधी कुणाची दिठी बावरी 
कधी कुणाची स्पर्श सावली ॥

कधी सोनेरी चुकली संधी  
कधी बक्षिसे पदरी पडली
मित्र सुटली पाश तुटली 
अन आठवण खोल रुतली ॥

जरी पाटीवर नसती अक्षर 
स्तब्ध सपाट दिसते वरवर 
तुझे हात जरी लिहणारे 
तुला न कळते त्याचे अंतर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

अक्षर

अक्षर
*****
आभाळात घन जीवन भरले 
मातीवरती अलगद पडले 
पोर इवले अंगणामधले 
रडे विसरून हसू लागले 

त्या हसण्याचे सोन कवडसे 
झाड होत एक नभात घुसले 
शाळा हिरवी अंगण हिरवे 
पुस्तक पाटी हिरवी झाले 

पाहता पाहता हिरवाईला 
सुंदर मधुर फळ लागले 
फळात होती अनंत शून्ये 
अनंत अक्षर गुपित दडले 

अक्षर जीवन अक्षर स्वप्ने 
अक्षरात मन हरवून गेले 
सोपे करुनी किती सांगावे 
आरश्यात रे  चित्र उमटले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

कोष

कोष
*****
आपल्यासाठी फक्त आपण जगत असतो 
कोषात सुरक्षतेच्या निवांत राहत असतो 

कधी कधी कोषाला पडतेच एक भोक इवले 
अन् मग वादळ जीवाला स्पर्शून जाते थोरले 

वादळाची झिंग आणि जाणवतो थरार 
उतावीळ जीव होतो त्यावर होण्यास स्वार 

पण तुटलाच कोष जर सुटले सर्व आधार तर 
वाटते भरवसा वादळावर कोणी ठेवायचा बर

येताच भान सुरक्षतेचे स्मरतात सर्व व्यवहार 
येवूनिया हाती सुई दोर  शिवली जातात छिद्र 

घोंगावते वादळ राहते गर्जत कोषावर धडकत
शांत निवांत निर्जीव कोषात कुणी राहते नांदत 

कोण जगले मेले कोषात कुणालाही नाही कळत 
भाग्यवान असती ते ज्यांना वादळ खांद्यावर घेत 

कोषात जगण्यापेक्षा वादळात मरण बेहत्तरअसत
जगण्याला जीवनाचा स्पर्श होणे महत्त्वाचे असतं 

अन वादळ पाहून जाणून जे त्याला नाकारतात 
खरोखर या जगी त्याहून दुर्दैवी कोणीच नसतात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

पथावर

पथावर
*****
कधी दिसे वाट कधी रे अंधार 
तुझ्या पथावर चालतांना ॥१

कधी तो प्रकाश डोळा दिपणारा 
जग तुटणारा क्षणभर ॥२

जगाचा कालवा कधी कानावर 
वाट अर्ध्यावर सोडू वाटे ॥३

सरू आले त्राण गात्र थकलेले 
मन आसावले मुक्कामाला ॥४

सवे वाटसरू सखे प्रियकर 
भार खांद्यावर टाकलेले ॥५

तया नेणे पार कर्तव्य ते एक 
दिले तूच नेक पार पाडे ॥६

तूच चालविता तूच थांबविता 
अन्यथा विक्रांता काय येते ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

कधी भेटेन (घेई उचलूनी)

घेई उचलूनी
*********
कधी भेटशीन मज बोलावून
समाधी सोडून ज्ञानदेवा ॥१

कधी मी पाहिन डोळे हे भरून 
निवृत्ती सोपान मुक्ताबाई ॥२

कधी रे कळेन गुह्यतम ज्ञान 
ठेविले पेरून ग्रंथांतरी ॥३

एवढीच आस घेऊन मनात 
तुझिया दारात आलो देवा ॥४

याहून आणिक नाही रे मागणे 
अशक्य ना देणे तुज काही ॥५

चातकाच्या चोची थेंबूटा आषाढ 
तैसा जीवनात माझ्या येई  ॥६

विक्रांत हा दास तुझ्या पायरीचा
जोहार दारीचा हाका देई ॥७

फिरे जन्मोजन्मी मायेत भुलला
घेई एक वेळा उचलूनी   ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

मोरया

मोरया
*****

तुझ्या कृपेची सावली 
मज मिळाली मोरया
पदापदावरी शांती 
मज वरे देवराया

काम विघ्नांचे रे इथे 
सदा संकटे आणणे
दीना गांजणे छळणे 
सैरावैरा पळवणे

होता दास तुझा देवा 
गेले दुःख ते पळून
झाले जगणे चांदणे 
गेलो सुखाने भरून 

अगा जगी तम नाही 
ऐसे कधी झाले नाही 
तुझे अधिष्ठान होता 
दिव्य दिशा झाल्या दाही 

मिळो मायेची पाखर 
अन्य काही नको देवा 
सदा रहा तू जीवनी 
नित्य घडू दे रे सेवा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

थेंब

थेंब
*****
उघडून बाहू उभे सागरात
इवले शिंपले स्वाती नक्षत्रात 

पडूनिया थेंब कुणाच्या मुखात 
फळेल हे भाग्य मोतीया रंगात 

तया ठाव असे कृपेचे इंगित 
केवळ प्रार्थना तयाच्या हातात 

उलटून स्वाती जाते संवत्सर
माहीत तयाला थांबणे तोवर 

तीच परिक्रमा त्याच पथावर 
कधी ओघळेल कृपा देहावर 

पसरून बाहू आपल्या मनाचे 
गात असे गाणे विक्रांत दत्ताचे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...