सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

दत्ता राहू दे रे जाग



दत्ता राहू दे रे जाग
***************
काळ्या काळ्या अंधारात
फणा धरलेला नाग
हातातल्या दिव्याला या
दत्ता राहू दे रे जाग     
 .
इवलेच तेल आहे
इवलीच आहे वात
धडाडून विझू पाहे
सावर दे तुझा हात 
 .
पायाखाली विंचू काटे
वाट मुळी नच दिसे
देई साद अवधूता
बोलाव रे तुझ्या दिशे
 .
घरदार सोडूनिया
बेभान मी निघाले रे
लोकलाज मानपान
चिंता नाही मजला रे 
 .
तुझ्या भेटी आधी पण
सरू नये तेल बाकी
काळोखाचा जय इथे
होऊ नये कधीच की
 .

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कधी मी दत्ताचा




कधी मी दत्ताचा
********
कधी मी दत्ताचा
कधी मी स्वतःचा
होऊनी जगाचा
भटकतो ॥

कधी मी शक्तीचा
कधी स्वरूपाचा
पांथस्थ वाटेचा
देवाचिया ॥

कधी मी रूपाचा
कधी अरूपाचा
आसक्त जगाचा
भासतोचि ॥

कधी सौंदर्याचा
कधी वैराग्याचा
साधक शब्दांचा
लीन होतो ॥

अवघे उदात्त
घुसे काळजात
ओढावतो त्यात
आपोआप ॥

जग म्हणू देत
अस्थिर विक्रांत
परि जगण्यात
दत्त आहे॥
.
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

तुझ्या दारी आलो






तुझ्या दारी आलो
*******************
चैतन्याच्या शोधात मी
पुन्हा तुझ्या दारी आलो
प्रेमाचा पाईक होत
शब्द उधळीत गेलो

सारे देणे असून ही  
हात तुझे थांबलेले
सारे घेणे असूनही
हात माझे बांधलेले

येणे माझे व्यर्थ नच
तुझे ते बोलावणेही
अप्राप्यचि क्षण होते
खरेच रे ते मलाही  

देई  पुन्हा कधीतरी
एकरुपता ती सारी
चांदण्याचा देह होवो
येताच मी तुझ्या दारी

असो सदा विक्रांत हा  
बघ वेडा तुझ्यासाठी
डोळीयांत तयाच्या त्या  
सदा जळो प्रेमवाती

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in
१६ .२.२०२०

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

बाप गजानन



बाप गजानन
राहतो उन्मनी
देह पांघरूनी
देहावर ॥
अति कनवाळू
त्रिकाळाचा ज्ञानी
लीलाधर मुनी
भक्त काम ॥
धावतो हाकेला
शरणागताला
अनन्य भावाला
भुकेला जो ॥
सोडा अहंकार
पडा पायावर
बाप हातावर
झेलीतो तो ॥
विक्रांत जाणतो
तत्व गुरुदत्त
तयाला मागत
आहे तेच ॥
***:
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

दर्शन



दर्शन
******
कृपेने दर्शन
आले ते घडून
प्रेमाने भरून
मन गेले ॥
अहो महाराज
बसवले पंक्ती
नसुनिया शक्ती
दान दिले ॥
क्षण सहवास
स्नेहाने दिलात
सुख हृदयात
उमलले ॥
घडे ना भाषण
साधना सांत्वन
उपदेश हान
शब्दे काही ॥
परि मी पातले
अंतरी जाणले
नाथे अंगीकारले
कृपा मूर्ती ॥
विक्रांत नाथाचा
जन्म ऋणाईत
बांधी खूणगाठ
मनामध्ये॥
.....
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

प्रीती झाला




पुन्हा तोच वार 
त्याच व्रणावर 
जन्म दुःखावर 
डाग नवा 

सुटता सुटेना 
व्यथेचा डोंगर 
जन्म पायावर 
उचलेना 

अवघी वचने 
करून भरली 
रानाने ऐकली 
मुक पणे 

आणि वाटवधे
स्नेहळ प्रेमळ 
करून घायाळ 
गेले कधी

गळे थेंब थेंब 
रक्त जन्मातून 
संपावे म्हणून 
संपेचना 


अवघा आक्रोश 
मृदुल फुलांचा 
मधूर गंधाचा 
प्रीती झाला



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

सुख दे रे दत्तात्रेया






सुख दे रे दत्तात्रेया
*************

सुख दे रे दत्तात्रेया
दुःख ने रे दत्तात्रेया
का मी शिणतोय येथे
कळू दे रे दत्तात्रेया ॥

जाणिवा या चिरेबंदी
दाटल्या आहेत गात्रा
मन ‌क्षुब्ध पिंजऱ्यात
शांत करी दत्तात्रेया ॥

पराधीन जगण्यात
फरपटत आहे दत्ता
प्रकाशाचा कवडसा
दिसू दे रे दत्तात्रया ॥

दुज्या हाती शोधतांना
सुख जाहले वाणवा
पदी तुझ्या ठेवी मज
स्थिर चित्ते दत्तात्रेया ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...