सोमवार, २ जून, २०१४

सखी






सखी असता सभोवताली
जीव हलका हलका होतो
प्राजक्ताचा सडा सुगंधी
माझ्या मनात बरसतो

कधी हसते कधी चिडवते
कधी पाय आपटत जाते
क्षणात सारे सारे विसरुनी
शहाण्या परि शांत बोलते

दिन वेचले कष्टामधले
सहजपणे मला सांगते
दु:ख गहिरे जगलेले  
उरातले वादळ कळते

कधी स्वप्नांचा उंच झुला  
माझ्या समोर उलगडते
तिज आश्वस्थ करतांना
मनात माझ्या धडधडते

गुपित कुठले आत ठेवले
कुणापासून काही लपविले
कधी कुणा कसे फसविले
सांगे सारे ती मनातले

तिच्या सोबत असतांना
काळ किती भरभर जातो
ती असण्याचा स्पर्श सदा   
जगण्याला घेरून राहतो    

घराकडे ती जेव्हा निघते
गुडबाय ही सहज म्हणते
येणे जाणे वरवर तिचे  
सदैव माझ्या मनी राहते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  

रविवार, १ जून, २०१४

प्रेम शोध




एक धागा तुटताच
दुसरा जोडू पाहतो
माणूस इथे एकटा
का कधी राहू शकतो

माणसाला स्पर्श हवा
शब्द हवे प्रेम हवे
सोबतीला जीवनात
उबदार सौख्य हवे

स्मृतींच्या दग्ध महाली
वेदनांची भग्न गाणी
सोडुनिया जावे त्यांना
स्वागतशील अंगणी

नवी प्रीत नवी गीत
यात नसे प्रतारणा
सुख शोध घेत जाणे
जीवनाची आराधना

प्रेमासाठी जगायचे
प्रेमामध्ये जगायचे
भेटत नाही तोवर    
शोधतच राहायचे

जगणे हाच असतो  
जीवनाचा अर्थ खरा
उधळूनी जग मग 
त्याच्या मिठीमध्ये जरा

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





शनिवार, ३१ मे, २०१४

भिरभिर डोळे






भिरभिर डोळे सांग कुणाचे
गाली लपले हास्य कुणाचे
उगाच येते याद कुणी का
सांज सकाळी रंग नभीचे
मनी घालते उगाच पिंगा
खट्याळ गोड बोल कुणाचे
जाता जाता खोल घुसती
नजरे मधले डंख कुणाचे
नाव घेता नीज ओठावरती
स्पंद वाढती का हृदयाचे
त्या स्पर्शाची ओढ अनावर
देह पीस का होते कुणाचे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, २८ मे, २०१४

आलीस तू







आषाढमेघा सारखी
आवेगात आली सखी

मिटली तप्त काहिली
नभात वीज हसली

ती अस्तित्वात भिनली
मी वादळ उर्मी ल्याली

थेंब थेंब मन झाले
स्वप्न पडून सावळे

शब्दात  प्रीत भिजली
प्राणात गीते सजली


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...