बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

घेवूनी येता चपाती बाजारातुनी


तुझेची नाव ओठी
तुझेची नाव पोटी
घेवूनी येता चपाती
बाजारातुनी
तुझ्या हातची भाकरी
तुझ्या हातची फोडणी
जीभेही येते गहिवरूनी
माझ्यासवे
भांडी ती सैपाकघरातली
गमती मज हिरमुसली
तुझ्याविना विरक्त झाली  
धूळ पांघरून
तो फ्रीज आतून रोडावला
माइक्रो बसून सुस्तावला
मिक्सर तर झोपला
केव्हापासून
ये तू ये लवकरी
कृपा कर माझ्यावरी
डाळभात भाजीभाकरी
देई प्रसाद

विक्रांत प्रभाकर


गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१२

हुकुमाची राणी

स्वप्नाची परी आपली
हुकुमाची राणी होते
जीभेची छडी तिच्या 
तोंडाची तोफ होते
दळायचा डबा हातात
भाजीची पिशवी येते
शहाणे गुलामी स्वीकारतात
त्यालाच प्रेम नाव देतात
शिळ्या भाताबरोबरच
आपला मान गिळून टाकतात
ज्यांना हे कळत नाही
तेच भांडत बसतात
त्यांचा संसार नासून जातो
एक करार फक्त उरतो
सुख सुख म्हणजे
अखेर काय असते
घरचे जेवण दोन वेळ
पोटभरून खाणे असते
कटकटी शिवाय संध्याकाळी
मस्त चहा पिणे असते

विक्रांत प्रभाकर

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

देव भक्ताचे नाते


देव भक्ताचे नाते विलक्षण
जाणले ज्याने जिंकले त्याने

काही न मागता असते मागणे
काही न देता सर्वस्व देणे

गदगदा रडणे असते सुखाने

आणिक हसणे अतिदु:खाने

अलोट प्रेमाने वेडे होणे

शहाण्यातून हद्दपार जाणे

घर जाळणे आपल्या हाताने

कटोरा घेऊन राज्य करणे

ठेवतो येथे जो स्वत:स राखून

चिंतामणी त्याने दिला टाकून

विप्र मागतो देवा हे दान

ऐसा भणंग करी गा संपन्न



विक्रांत प्रभाकर 

http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१२

चतकोर भाकर

ते घर आपुले नव्हते
तरीही  तेथे गेलो
ओरडलो हाक मारली
आत घ्या हो वदलो
किंचितसे ते किलकिलले
कुणी आतून डोकावले
चतकोर भाकर
घालून हातावर
बंदही  ते झाले .
पुन्हा एकदा तीच कथा
पुन्हा एकदा तीच व्यथा
हळू हळू मग मीही झालो
व्यावसायिक भिकारी
हिंडू  लागलो  दारोदारी
आत घ्या हो उगा ओरडत
चतकोर सारे गोळा करत
आणि आता कदाचित जर
दार उघडले तर ....
हीच  भिती दाटत आहे
चतकोरातील आनंद माझा
अन  आता वाढत आहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

चहा सुंदर

चहा सुंदर पिवून 
जिव्हा गेली लाचावून
झाले रसमय मन
जड़  समाधी लेवून

उष्ण चविष्ट घोट
हळू  उतरे घश्यात
वाफ स्पर्शून ओठ
झाले गंधित प्राण

पाणी साखर चहा
यात मिसळता
दुध

वर आले फेसाळून
पेय अमृत होवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१२

माझी कविता तू वाच



माझी कविता तू वाच
तुझी मी वाचतो
तू मला छान म्हण 
मी तुला छान म्हणतो

ओरडून विकली
की रद्दी ही खपते
फालतू असून ही
बालभारतीत बसते

खरतर कवीची
वहीच काय ते
नशिबही अगदी
फाटके असते

इथे मार्केटिंग
ज्याला जमते
त्याचेच फक्त
भले होते

नाव मिळते
पुस्तक खपते
कधी कधी चक्क
पारितोषिक मिळते

सगळ्यांच्या कवितेत
वेगळे काय असते
पाऊस प्रेम पक्षी अन
कुरवाळलेले
दु:ख दिसते

तुला मला सगळे
जरी ठावूक आहे ते 
तरीही तेच पुन्हा
लिहायचे असते 

एकमेकांना छान
म्हणत म्हणत
आपले कंपू
जोडत वाढवत

दुसरयाची कविता
आवडो न आवडो
वाहवेचा धुरळा
उडवायचा असतो


म्हणून म्हणतो
पुन्हा सांगतो
माझी कविता तू वाच
तुझी मी वाचतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

येऊ नकोस कधीही

येऊ नकोस कधीही
पुन्हा आता तू
असशील तेथे सदैव
पण सुखी रहा तू 

सूर तुझेनी माझे
नच जुळले कधीहि
रिझविणे माझे तुजला
जा विसरून आता तू

गीत आपुले आपण
होते सजविले छान
कडव्यात हरेक सदा
कळेना भांडलीस का तू

प्रत्येक जीत तुझीच
मी दुरावलो दूर
पण जिद्द तुझी का
न सोडलीस तू

तू पशिमेची अन 
मी पूर्वेचा सदैव
भेद मिटले कधी न
ना मिटवले कधी तू

आता तरी निदान
ठरवू अखेर आपण
जातो मी माझ्या वाटे
सुख शोध तुझे तू

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...