साधु बैरागी
*********
घरदार नसलेले संसार सोडलेलेतथाकथित
आासक्ती पाशा पासून मुक्त झालेले
साधु बैरागी
अन्न वस्त्राची फिकर सोडलेले
तरीही हातामध्ये घेऊन कटोरा
भिक्षेसाठी थांबलेले
साधु बैरागी
निवाऱ्याची चिंता नसलेले
तरीही निवारा घेत आणि शोधत असलेले
अन चिमूटभर गांजाला आसुसलेले
साधू बैरागी .
दिसत होते मला
काम क्रोधाचे न मिटणारे रंग
कळत नकळत मनात बाळगत
साधुत्वाच्या अहंकारावर आरुढ झालेले
साधू बैरागी ॥१
तर मग हा निसंगत्वाचा अर्विभाव
देव शोधनासाठी आहे की
काम चुकारपणा करता आहे
किंवा हा ऐदी जीवन जगण्याचा
राजमार्ग आहे मला कळत नव्हते
असे शेकडो हजारो लाखो साधु
राजमार्गावर तीर्थस्थानावर
झुंडी झुंडीने मठामधून
तटा तटावर घाटा घाटावर
बसले आहेत ठाण मांडून .
आणि तरीही तरीही तरीही
एक अनामिक आकर्षण
त्यांच्याविषयी
त्यांच्या जगण्याविषयी
येते मनात दाटून .
जमीन अंथरून आणि आकाश पांघरून
घेण्याची ती उर्मी ती धाडस
पंचमहाभूतांशी एकरूप होण्याची
ती शक्ती ती वृती
नसलेपणात वावरण्याची ती हिंमत
त्याच्यासमोर नतमस्तक होते मन ॥२
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा