गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

स्व.लक्ष्मणराव गायकवाड (का कुणास ठावूक)

स्व.लक्ष्मणराव गायकवाड (का कुणास ठावूक)
*****************
माझ्या लहानपणीची अतिशय आवडती मावशी सती मावशी तिचा नवरा .
त्यांना देवाज्ञा झाली असे कळले .
अन जाणवले की 
अरे आपण गेली चाळीस वर्ष 
या माणसाला पाहिले नाही भेटलो नाही 
त्यांना नाही तर सती मावशीला ही
तिच्या मुलांनाही पाहिले आणि भेटलो नाही 
चाळीस वर्ष आपली मावस भाऊबहीण 
आपले कोणीच नाहीत
असे का झाले कुणास ठाऊक?

मी लक्ष्मणरावांना प्रथम पाहिले होते 
ते त्यांच्या लग्नातच घोड्यावर बसलेले 
डोक्याला बाशिंग बांधलेले 
मुंडावळ्या लवलेल्या रूपात
तो एकूणच रूबाबदार 
सरळ नाकाचा देखणा चेहरा असलेला 
लोभस माणूस होता 
तोंडात पान बहुदा कोरलेली मिशी 
एकदम तुळतुळीत दाढी 
कुठल्या राजपुत्र पेक्षा कमी दिसत नव्हता 
मला हा मावशीचा नवरा खूपच आवडला .
पण प्रत्यक्ष ओळख होणे बोलणे 
हे सर्व व्हायला किती जावे लागले 
पण खरी ओळख कधी झालीच नाही 
कारण कुणा न ठावूक ?

कुठे पुढे कळले 
ते त्यांना झालेले आजारपण 
त्यांच्यावर आजीने केलेला उपचारासाठी खर्च 
त्यांना मिळालेला पुनर्जन्म 
पुढे असेही कळले की 
ते मावशीला पाठवतच नाहीत माहेरी 
आम्हाला कुणालाच भेटायला  
का कुणास ठाऊक ?

मग मावशीही भेटायची खूप कमी होत गेली 
पुढे दूरवर लांबवर पुण्याच्या वेशीवर 
चंदन नगरला राहायला गेली 
तर मग हे काका कुठे भेटणार ?
पुढे काकानी टॅक्सी ड्रायव्हरचा पेशा स्वीकारला 
असे कळले ते पुणे मुंबई करायचे
आम्ही मुंबईला 35 वर्ष काढूनही 
क्वचितच ते आम्हाला भेटायला आले 
का कोणास ठाऊक?
.
पुढे आमची आई म्हणजे अक्का गेली 
तेव्हाही हे काका व सती मावशी 
कोणी सुद्धा भेटायला आले नाही 
किंवा कोणी सांत्वनाचे दोन शब्द पाठवले नाही पुढे आजीही गेली आजोबाही गेले 
नात्यातील मुख्य गाठीत सुटून गेल्या 

रस्ते वेगळे झाले होते 
राहुल राजश्री जयश्री गणेश यांचे 
लहानपणीची गोड चेहरे 
अजून आठवत आहेत मला 
ते जीवलग झाले असते पण तसे झाले नाहीत
का कोणास ठाऊक ?

झाडाच्या प्रत्येक फांदीचे 
एक वेगळे जग असते हेच खरे 
त्याची ती  पाने फुले फळे 
त्याच्या आधारावर  असतात
त्याच्या सत्तेतवर जगतात
आणि जर ती फांदी वेगळी पडली 
वेगळी झाली तर त्या फांदीवर 
फुललेली ती फळे फुले पाने 
ती ही वेगळी होतात दुरावतात .
तसेच काहीसे झाले होते 
लक्ष्मणराव गायकवाड अन् 
त्यांच्या कुटुंबीयांचे आमच्या सर्वांसोबत 
त्यांची  ती मुले कधी मोठी झाली 
त्यांची लग्न झाली त्यांची संसार फुलली
कळलेच नाही.
 
तशी मनात त्या मुलांची सती  मावशीची अस्पष्टशी स्मृती होती 
एक दोनदा भेटायचा प्रयत्न केला गेला 
पण तो सफल झाला नाही 
का कुणास ठाऊक 
काही नाती अशीच असतात 
जी  नियती कधीच जुळू देत नाही 
का कुणास ठाऊक?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...