सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

खेळ

खेळ
****
संपवावा वाटे डाव हा चालला 
खेळ जो लांबला 
उगाचच ॥१
बांधावा हा पट सोंगट्या डब्यात
मिटून शून्यात 
स्तब्ध व्हावे ॥२
पडती कवड्या कोणाच्या इच्छेने 
हरणे जिंकणे 
घडे खोटे ॥३
मज अवघ्याचा आलाय कंटाळा 
कळेना जुंपला 
कोणी मला ॥४
प्रतिमा पदवी खोटे मानपान 
अवघे सामान 
पाठीवरी ॥५
रिती नातीगोती नाकात वेसन 
कर्तव्या बांधून 
चालणे हे ॥६
सरो चाचपडणे सरो धडपडणे 
विक्रांत नसणे 
होवो आता ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दरवळ

दरवळ  ******* शब्द काही दिलेस मला  तू  रांगोळीत रंग भरतांना  अन् स्वप्न नव्या जगण्याचे तम प्रकाशी विरघळतांना ॥ थरथरले मृदू ओठ तु...