मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

भेट

भेट
*****
माझे शब्द तुला कळतीलच असे नाही 
माझे चित्र तुला उमजतीलच असे नाही 
त्यांनी फारसा फरक पडत नाही 
पण मग तेवढे एक काम कर 
स्वल्पविरामातील क्षणात 
दोन ओळी मधील अंतरात 
जरा वेळ थांब मला आठव 
अन् सापडलेला भाव मनात साठव 
दोन किनाऱ्यामधील सेतू 
तो कसलाही असू देत 
माती सिमेंट वाळू लाकूड लोखंड 
तो ओलांडणेच महत्त्वाचे असते 
किनारे मिळणे महत्त्वाचे नसते 
किनारी कधी मिळतच नसतात 
नाही का ?
पण सेतू ओलांडणे आपल्या हातात असते 
शब्द निरर्थ आहेत न कळू देत न वळू देत 
मी शब्दात असेलही वा नसेलही 
पण शब्द शून्यत्वाच्या अवकाशात 
नक्की भेटेल तुला
कारण तिथे तिसरे कोणीच असणार नाही
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गाणे

गाणे **** काही उरली सुरली  माझी निरोपाची गाणी घेई उचलूनी हाती देई दूर वा सोडुनी ॥१ मुठ करता रिकामी  मुठ मुठ न उरते  होते साठवले ...