शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

शोध

शोध
****

श्रेयाच्या शोधात चालतांना 
जगण्याचे इप्सित गाठतांना 
श्वासात श्वास असे तोवर 
आकाशपाताळ एक कर 
पालथ्या घाल दाही दिशा 
विसरून जा दिवस निशा 

ध्येयासाठी जग हवे तर 
ध्येयासाठी मर हवे तर 
लाखो येतात अन जातात 
कशास भर घालतोस त्यात

ही वाट एकटी चालतांना 
आसक्ती मागे खेचत असतांना 
कधीच मागे फिरू नकोस 
कुठे कुणास्तव थांबू नकोस 

मुक्कामा जागा नसेल तर 
खुशाल रहा उघड्यावर
पोटाला अन्न असेल तर 
पाण्यावर गुजरान कर 

निजाया वाकळ नसेल तर 
ही भूमी अंथरून घे 
पांघराया चादर नसेल तर 
हे नभ पांघरून घे 

तिथे सुख असणार नाही 
मानसन्मान मिळणार नाही 
अपमान होतील पदापदावर 
चोर समजून बसेल मार
तेव्हा याद येईल घर
धन सुरक्षा जीवलग यार 
सारे म्हणतील मागे फिर 
कर्तव्याचे अन पालन कर 

तरीही त्यास ठकू नकोस 
वाट घेतली चुकू नकोस 
शोधतांना मरण आले तर 
अरे माघारीहून तेही बरं

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...