शब्दखेळ
****
खेळ शब्दांचा मांडला
तया वाचून रे अन्य
काही येत न मजला ॥
शब्द जलाने दयाळा
तुजला स्नान घातले
शब्द धूत पंचा घेत
जल उरले टिपले ॥
शब्दगंध केशरी ते
भाळी दुबोट रेखिले
शब्द वस्त्र रेशमी हे
रूपा सगुणा वेढीले ॥
शब्दफुले वाहुनिया
शब्ददीप पाजळले
शब्द धुपाने सखया
दत्ता तुज ओवाळले ॥
शब्द हिना गंध धुंद
तव प्रेमे मी लावले
देह शब्द झाला सारा
नमिता दत्त रूप आले ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा