रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

दत्त दरवेश


दत्त दरवेश
*********

दत्त होत दरवेशी 
मज नाचवी जगात 
खेळ दाखवी हसवी 
दोरी घालून नाकात 

उड्या मारवी सुखाने
दुःखे लोळवी मातीत 
कधी लढाई खोटीच 
छाती उगा बडवीत 

जशी वेसन हलते 
तसे शरीर वाकते 
अशा अगम्य खेळात 
पशुपण विसरते 

कुणी म्हणती तयास 
क्रूर किती दरवेश 
कुणी करती कौतुक 
त्याचा पाहून आवेश 

मज कळे शरणता 
पाहे अहंता मरता 
मनी सुखावतो किती 
देव सांभाळे विक्रांता.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...