रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

वही

वही
*****

माझ्या कवितेची ही वही 
आता भरत आलेली आहे 
या वहीची बरीच पाने ही 
आताशा सुटत चालली आहे.

खरं तर खूप काही लिहायची 
ती उर्मी ही आता विरत आली आहे 

जरी अजूनही सवयीने 
काही शब्द मनी रुंजी घालतात 
काही यमके काही कल्पनाही 
आतून रुजून सजून बाहेर येतात 

तेही एक ऋतुचक्रच आहे
मन असे तोवर चालूच राहणार 
आपण आपल्या सुखदुःखात 
गोल गोल गिरक्या घेत बसणार 

माझी वही ही नाही तुकोबाची 
नाही नामदेव ज्ञाना चोखोबाची
म्हणूनच आकाशाला भिडलेली 
स्वप्ने नाहीत मुळीच तिची 

माझी हि वही  रेघोट्यांची 
डोंगर सूर्य झाडे आणि नदीची 
माझ्यापुरती माझ्या जगाची 
जुळल्या मळल्या सुटल्या शब्दांची 

जर कदाचित उद्या तुला 
माझी वही सापडली तर 
अन वरचे पान काढून तू जर 
चिटकवले तुझे पान त्यावर 

काहीच फरक नाही पडणार 
ती वही तुझीच असणार 
आणि कदाचित लिहिलीस तू 
स्वतःचीच काही रेखीव अक्षर 
तरी ती वही माझीही असणार 

म्हणूनच हे शब्द ही अक्षरे या कविता 
मी माझ्या मानल्याच नाही आजवर 

फक्त या वहीला होणारा
या पेनाचा स्पर्श 
त्या संवेदना त्यातील जिवंतपणा 
मला कळतो समजतो 

या क्षणात त्या चांदण्यात 
तिच्या अस्तित्वाचा अर्थ 
आणि प्रश्नार्थ
तिच्या सवेत माझ्यातही उमटत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...