शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

विहीर

विहीर
***

तुझी सुखाची विहीर 
काळया चिऱ्यात बांधली 
पाणी भरून शेंदून 
भिंत ओली चिंब झाली॥

रोज मारून चकरा 
नाही  रांजण भरत
तुझे दुःखाचे रहाट 
फिरे कण्हत गंजत ॥

किती पडल्या रडल्या 
किती बुद्ध्याच सांडल्या 
जन्म उपसणे सारा 
अंती झिजल्या बादल्या .॥
 
तुझी कथा विहरीची 
खोल कातळ पाण्याची 
जाणे घडो वा न घडो
घडा बांधल्या दोरीची ॥

काय सांगू सई बाई 
पाणी भरता तू घरी
तुझ्या स्नेहाच्या ओलीने
सुख तराराते दारी ॥

तुझ्या काचल्या हाताने
जीवा जीवपण येते
तुझ्या सर्वस्व शिंपणी
जग हिरवे हे होते.॥

कुणा कळावी हि माया 
तुझ्या अंतरी दाटली
कष्ट काबाडली काया 
प्रेमे घरात झिजली ॥

***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...