मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

दत्त दिवाळी

दत्त स्मरण दिवाळी 
दत्त भजन दिवाळी 
दत्त नमन दिवाळी 
माझी नित्य रे चालली ॥

दत्त पूजेने मानस 
घडे अभ्यंग ते स्नान 
दत्त कृपेचे प्रेमाचे 
नित्य लावतो उटण ॥

दत्त नामाचा फराळ 
सांगू किती रुचकर 
जीभ लाचावते सदा 
माझे अथांग उदर ॥

दत्त घोषात घुमती 
देही फटाके फुटती 
आत प्रकाश लाटांनी 
सप्त लोक उजळती 

मन रेषेत चालते 
जणू आखली रांगोळी 
वांच्छा मंगल पवित्र 
कणा-कणात उजळी ॥

चाले औक्षण सप्रेम 
जीवा कडून शिवाचे 
तनमन धनासवे 
झाले अर्पण सार्‍याचे ॥ 

ओळ दिव्यांची अंतरी 
ऐसी विक्रांत लागली 
दत्त पूजन आनंद 
घडे मंगल दिवाळी ॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...