***********
राजा बोले दळ हाले कणखर मान डोले
सारे ठाव बोललेले
ज्ञान थोर भार झाले
नवे काही नसुनिया
सुरामध्ये सूर चाले
होय होय हेच खरे
होयबाचे झाड डोले
तेच सूर तोच ताल
घोटलेले तेच बोल
चढताच वर पट्टी
कानाखाली दिसे ओल
हो रे बाबा हेच जिणे
पोटासाठी प्यादा होणे
तुझा मान तुझे भान
रद्दीमध्ये गुंडाळणे
डोईवर छत्र नको
हुजुरे ते मित्र नको
रंगुनिया लाख गेले
त्यात तुझे चित्र नको
आतमध्ये बसलेला
त्याच्यासाठी मान डोल
गादीवर बसल्याचे
उद्या होय शून्य मोल
सारे काही जाणुनिया
कारे तुझ्या पायी दोरी
विक्राता रे उडी मारी
दत्त झेले हातावरी
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा