सोमवार, ३० नोव्हेंबर, २०२०

ती रेवा


कधी  एकदा 
आडवाटेने
पथि चालता 
वाट चुकता ॥

जरा हासरी 
जरा लाजरी 
एक गुजरी 
मला भेटली ॥

चेहऱ्यावरी 
होता घुंगट 
काना मध्ये 
डुल डोलत ॥

ओठावरती 
नव्हती लाली 
रंग लावला 
अथवा गाली.॥

मधुर बोल 
कानी पडले
प्रसन्नतेचे 
मळे फुलले ॥

निर्मळ हासू
निर्मळ डोळे
जणू करुणा
डोह भरले  ॥

हात रापले
कष्टा मधले 
पायतन ही 
नच घातले ॥

दुःख नव्हते 
नव्हती व्यथा 
सजल्या होत्या 
अवघ्या वाटा ॥

जरा बोलली 
वाट दावली 
वळणा वरी 
निघून गेली ॥

काय असे ही 
माय नर्मदा 
उगा वाटले 
माझिया चित्ता ॥

असो नसो वा 
रेवा माय ती 
प्रसन्न मुग्ध 
कृपाच होती 

गाता अष्टक 
गाता आरती 
मनी उमटे
तिचीच मूर्ती 
**********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...