*****
दिवा मातीचा मातीचा
एका पेटल्या मातीचा
एक लहरी फुंकर
म्हणे आजचा उद्याचा
नको उगा फडफडू
ज्ञान अंधाराला सांगू
चार पाऊले अंतर
कुण्या पांथस्थाला दावू
कुणी येईल उबेला
तया सांगावे वेड्याला
घेई पेटवून टेंभा
मग लाव शेकोटीला
दिवा जळतो म्हणून
जगा प्रकाश मिळतो
तया प्रकाशात परी
अहं तयाचा नसतो
तसे जळावे अंतरी
दैन्य जगाचे पाहुनी
स्नेह करुणा वातीनी
जगा जावे उजळूनी
हेचि मागतो मी दत्ता
हेचि दान दे विक्रांता
ऐसी करुणा दे चित्ता
द्यावे सहज जगता
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा