(कोरोनाकाळात बरेच निर्बंध होते लिहायला म्हणून ही कविता प्रकाशित करायचे राहिली होती )
****
मरतात जन
धडाड येऊन
श्वास अडकून
कळल्यावाचून ॥
येतसे मरण
होय आक्रंदन
पीईपी कुणास
प्लास्टिक कफन ॥
येतात सयंत्रे
मागणी वाचून
जागा न ठेवाया
राहती पडून ॥
नवीन सामग्री
नवीन कॉन्ट्रॅक्ट
संधीसाधू च्या
अवघे खिशात ॥
जयाची पॉलिसी
तया मिळे जागा
इतरांचे माथी
नशिबाने भोगा
भरे प्रायव्हेट
हॉस्पिटल ऐसे
चार गोळ्या खात
रिते झाले खिसे
भितीचे सावट
कुणा भांडवल
भुके मरू गेले
कुणी ते कंगाल
रडतात मुले
बायका रडती
धास्तीत पळती
शेजारी दडती
कोण लावतोय
बाजी ती जीवाची
झोकून स्वतः घे
काळजी जगाची
आणि कुणी घेतो
श्रेय ते फुकट
वशिला लावून
ट्रॉफीच्या सकट
मरण तांडव
जगाने पाहिले
कुणाच्या स्वार्थाने
हाताने ओढले
लागण होऊन
जगले वाचले
पुढे तयासाठी
काय ते ठेवले
सांगेन काळ ते
तोवर प्रार्थना
जगता सांभाळा
दत्त दयाघना
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा