ज्ञानदेव माय
**********
नाही डोक्यावर पडला तो हात
ज्याने हा विक्रांत
नाही होय ॥१॥
बहुत ऐकली
कोणाची ती कीर्ती
स्वाधीन ती शक्ती
जया असे ॥२॥
परी दगडास
मिळाली ना स्फूर्ती
मिटली ना वृत्ती
देहातील ॥३॥
म्हणतात कोणी
बीज रे पेरले
होय उगवले
एके दिनी ॥४॥
घडो ते घडणे
कुणाला कळणे
जीव तहानेने
व्याकूळला ॥५॥
बसली पंगत
उपाशी विक्रांत
तोंडावर हात
ठेवलेला ॥६॥
ज्ञानदेव माय
झडकरी येत
घास या मुखात
घालना ग॥७॥
हट्टी या बालका
नको रागावूस
सोडून देवूस
गर्दीमध्ये ॥८॥
शोध ग मजला
धरी ग हाताला
घेऊन घराला
जाय पुन्हा ॥९॥
********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा