मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

कळणे

कळणे
******

आता फक्त 
काही वर्ष 
कदाचित महिणे 
सांगता येत नाही पण 
फक्त दिवसही 
असतील उरले जगायला !

दूरवर असलेल्या गाव 
जसा जसा जवळ
येऊ लागतो 
आणि गाडीतील सामानाची 
आवराआवर सुरू होते 
तसं काहीसं झालं आहे  .

खरंतर पन्नाशीनंतर 
प्रत्येक वर्ष 
प्रत्येक दिवस 
हा बोनस असतो 
नाही का  ?

आता तर आपण 
मोकळं व्हायचं असतं 
सार्‍या  पाशातून 
मोहातून आसक्तीतून  
पण  हा गुंता 
काही केल्या सुटतच नाही  

बऱ्याचवेळा मी 
मलाच विचारतो 
अरे जे पाहिजे होते 
ते सारे मिळालं ना 
अजून काय पाहिजे  

तर मग ही अतृप्ती का ?
ही बोच का ?
ही अस्वस्थता का  ?

मग मीच मला सांगतो 
अरे जगलो ते खरं आहे 
पण का जगलो ?
हे कळले नाही  !

माझा प्रश्न 
जगण्याचा नाही 
माझी चिंता 
मरण्याची नाही 
माझा फक्त एकच  
प्रश्न आहे 
एकच इच्छा आहे 
एकच आकांक्षा आहे 
आणि ती म्हणजे 
हे कळण्याची !

बस 
हे कळणे माझ्यासाठी 
प्राधान्याची गोष्ट 
होऊन बसली आहे 
कदाचित या कळल्यामुळे 
माझ्या बाह्य जीवनात 
फारसा फरक पडणार नाही 
पण हे कळणेच  
माझ्या जीवनाचे ईप्सित आहे 
हे मात्र नक्कीच !

आणि हे कळणे 
जोपर्यंत जीवनात अवतरत नाही 
तोपर्यंत जीवन हे अपूर्णच राहिल.


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...