वसुंधरा
*******
आपल्या गोर्या कातडीचा
गर्व करणार्या
युरोपियन लोकांची
का काळ्या शरीराच्या
गुलामीचा अपमान साहीलेल्या
आफ्रिकन जीवाची?
पित वर्णाच्या बारीक डोळ्यांच्या
जगावर हुकुमत करू इच्छणार्या
चिनी जपानी कोरिअन लोकांची
की त्या ताम्रपर्णी गडद डोळ्यांच्या
गुढ गंभीर आत्ममग्न
मध्य आशियन लोकांची .?
वा कधीही ही आपले बेट
सोडून न गेलेल्या
अंदमान निकोबार मधील
त्या आदिवासींची अन
ऑस्ट्रेलियामधील मूळ जीवांची
घनदाट जंगलात वा
सुदूर वाळवंटात
राहणाऱ्या कष्टमय जीवन जगणाऱ्या
आणि येथेच संपून जाणाऱ्या
त्या अनाम वंशाची.?
ही वसुंधरा कोणाची . .?
शिस्ती मध्ये जाऊन
नीट नेटके बसून
मोठमोठ्या चर्चमध्ये
प्रार्थना करणाऱ्या ख्रिश्चन लोकांची
का तांड्या तांड्या मध्ये जमून
भर रस्त्यामध्ये आसन घालून
रांगा लावून नमाज पढणाऱ्या
धर्मवेड्या मुसलमानांची
वा मोठमोठ्याने टाळमृदुंगाच्या नादात
स्वतःला हरवून जाणाऱ्या हिंदूंची
का हातामध्ये मेणबत्ती आणि उदबत्ती घेऊन
शांतमूर्ती गौतम बुद्धापुढे
नतमस्तक होणाऱ्या बौद्धांची .
अथवा धर्माला अफूची गोळी म्हणून
धर्म नाकारणार्या आणि
माणुसकीलाच देव मानणाऱ्या
पण सत्तेवर स्थापन होताच
त्याच माणसांना
सहजच मारून टाकणार्या
साम्यवाद्यांची ?
हि वसुंधरा कोणाची ?
मोठमोठ्या इमारती
सुंदर महाल
देखण्या हवेल्या बांधून
सुख संपन्नतेने जगणाऱ्या
सारे उपभोग घेत राहणाऱ्या
धनिकांची
का बकाल अस्ताव्यस्त पसरलेल्या
झोपडपट्ट्यातील
केवळ निद्रेसाठी
वितभर जागेत मुरकुंडी करून
पडणाऱ्या गरीबाची.?
ही वसुंधरा कुणाची ?
हिरव्यागार वृक्षावर बसणार्या
आणि आकाशात स्वछंद विहार करणाऱ्या गोजीरवाण्या पाखरांची
हिरव्या कुरणावर फिरणार्या चरणार्या हरणांची
गाईंची मेढ्यांची बकर्यांची
अन भेदक डोळे आणि अस्तित्व म्हणजेच जरब असणार्या वाघांची सिंहाची ?
ही वसुंधरा कुणाची
तीन चतुर्थांश पणें व्यापलेल्या पाण्याची
त्यात असलेल्या अजस्त्र जलचराची
शार्क डॉल्फिन देवमाशांची
की इवलाल्या जेलीफिश झिंगे कालव्यांची खेकड्यांची.
की त्या अजस्त्र जहाजे व विशाल जाळ्यांनी
त्यांच्यावर आक्रमण करत त्यांना पकडत
टण टणाने मासेमारी करणाऱ्या
श्रीमंत मासेमारी कंपन्यांची?
ही वसुंधरा कोणाची ?
जागा मिळेल तेथेच रुजू पाहणार्या
पाणी मिळेल तेथे वाढणाऱ्या
झाडांची झुडपांची वृक्षांची
फुलणाऱ्या सजवणाऱ्या सुगंध देणाऱ्या
वेलींची
का या सार्यांची अमानुषपणे
कत्तल करून येथे
मोठी शहरी उभाणाऱ्या बिल्डरची
त्यात राहणार्या माणसाची ?
खरेच कुणाची आहे हि वसुंधरा?
तुम्ही मला सांगाल
ही वसुंधरा दोघांचीही आहे !
पण असे म्हणणे म्हणजे
प्रश्न टाळणे नाही काय ?
होय ही गोष्ट खरी आहे की
प्रत्येकाला ही वसुंधरा
आपलीच आहे असे वाटते
पण जर ही वसुंधरा सर्वांचीच असेल
तर मग
इथे हा भेदभाव हा विरोधाभास
हा संघर्ष हे असहाय जीवनमरण
हि युद्ध हे मृत्यूचे तांडव
हे दैन्य हे शोषण हि पराधिनता
का आहे ?
एक जीव दुसऱ्या जीवाला का गांजतो ?
एक जण दुसर्याला का लुबाडतो ?
एक मासा दुसर्या माशाला का खातो ?
ती असामान्य सूक्ष्म तरल
विश्व निर्माण करणारी प्रज्ञा
तिला काय गरज होती
हे असे विश्व निर्माण करायची ?
कदाचित हे असेही नसेल का?
कि ही वसुंधरा कुणाचीच नसेल !
लाखो वर्ष या पृथ्वीतलावर
राहणार्या डायनोसॉरलाही वाटत असेल की वसुंधरा त्याचीच आहे !
तसेच काही कदाचित
आपल्या बाबतही होत नसेल काय ?
*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा