***********
एक निळे आकाश उघडले
अन अंधारातील पाखरांना
जाळ्यात जखडलेल्या पंखांना
जगण्याचे मर्म कळले
सोडवत नव्हते संस्कार
हजारो वर्षांचे
सोडवत नव्हते पाश
मानलेल्या गुलामीचे
पण कळून चुकले होते
आता नाही
तर कधीच नाही
सूर्य तळपत होता
शब्द परजत होता
प्रकाशाचा अर्थ
गवसत होता
कणाकणात दाटलेला
तम निवळत होता
खरेतर त्यांना द्यायचा होता
पर्याय नसलेला पर्याय
कुठलीही दिशा
न दाखवणारी वाट
कुठलाही फलक
नसलेले देवालय
पण आधाराची
सवय असलेले आम्ही
आम्हाला ते शक्य नव्हते
निराधार होऊन
सारे काही सोडून
पंख पसरून
स्वतःला देणे सोडून
वार्याच्या झोतावर
म्हणून मग त्यांनी
हाती दिला एक
सहज तोडता येणार दोर
अत्त दीप म्हणत
भिरकवता येणारा
प्रत्येक आधार
एक पर्याय म्हणून
पण आता
मुक्तपणे उडतांना
स्वतंत्र श्वास घेताना
एक भय आहे मनात
या पर्यायी दोरीची
एक शृंखला
एक पाश होऊ नये
कधी भविष्यात
आमच्याकडून
********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा