शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

डॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली

डॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली
***************************

 खूप मित्र मिळवतो 
आपण आपल्या जीवनात
काही मित्र असतात 
सतत किंवा बराच काळ 
आपल्या अवतीभवती वावरत
आपण त्यांच्यात मिसळतो 
हसतो खेळतो बोलतो 
पण काही कारणाने 
अचानक ते मित्र दूर जातात 
पुढे कधी कधी महिने अन महिने 
वर्ष अन वर्ष त्यांची भेट होत नाही 
कधीकधी  उडत-उडत 
खबर येतात त्यांच्याबद्दल 
कुणी बोलतो 
त्याचे असं झालं तसं झालं रब
त्याला मुलगा झाला 
त्याला मुलगी झाली 
त्याच्या मुलाचे लग्न झाले 
आता तर नातू झाला आहे 
वगैरे वगैरे . . 

जरी तो आपल्या जीवनात  
या क्षणी नसला तरी 
तो कुठेतरी आहे आणि सुखात आहे 
आनंदात आहे 
एवढे आपल्याला पुरेसे असते

पण अचानक एखादी बातमी येते 
आणि आपल्याला कळते 
तो मित्र आपल्यात राहिला नाही 
तेव्हा ही खबर 
एखाद्या बाणासारखी हृदयात 
खोलवर रुतत जाते

आज सकाळी 
अशीच एक बातमी आली 
डॉक्टर राजू गायकवाड गेला 
अविश्वसनीय बातमी होती 
खरी वाटत नव्हती
मग खात्री करून घेतली 
मन विषादाने आणि दुःखाने भरून गेले 
सदैव हसतमुख असलेला 
आपल्या जगात 
आणि आपल्या सुखात 
रंगलेला हा मित्र 
त्याने विचारपुर्वक ठरवलेल्या 
जगण्याच्या चाकोरीतच जगत होता 
एक आखीव-रेखीव नेटके जीवन 
सुखी समाधानी जीवन 

त्याचे घर त्याची नोकरी 
त्याचा दवाखाना त्याचा संसार 
सुखाने राहत होता तो
दृष्ट लागू नये असे त्याचे जीवन  

आणि कोरोनाच्या 
या लाटेत या तडाख्यात 
ध्यानीमनी नसताना तो सापडला 
तसा तर तो योद्धाच होता 
व्हेंटिलेटरवर जाऊन जिंकून
परत आला होता पण 
ते घाव खूप खोलवर गेले होते 
अन त्या घावांमध्येच 
त्याचे श्वास हरवुन गेले .

मला खरंतर काहीच माहिती नव्हती 
हे सगळे घडले तरीही 
आणि कळली ती फक्त 
शेवटची बातमी 

राजुला एक सवय होती 
दुसऱ्याला अंदाज करायला लावायची 
अन अचानक रहस्य उद्घाटन करून 
त्याला चकित करायची
दुसऱ्याचे आश्चर्याचे भाव टिपण्यात 
त्याला आनंद वाटायचा 
मग तो हसायचा तो मिश्कीलपणे 
अगदी मनापासून 
कधी कधी खोडकरपणे 
प्रश्नही टाकायचा समोरच्याला 

पण यावेळी त्यांने  प्रश्न टाकला नाही 
अंदाज करायला लावले नाही 
काही काहीच कळले नाही 
आजारपण नाही 
दुखणे नाही
नंतरचे भोगणे नाही 
काहीच सांगितले नाही 
एक धक्का दिला 
अविश्वसनीय 
आणि तो निघून गेला 

राजूची स्वतःचे एक तत्त्वज्ञान होते 
लो प्रोफाईल मध्ये राहायचे 
कुणाच्या डोळ्यात न येण्याचे 
आपले जीवन आनंदाने जगायचे 
आपली कर्तबगारी हुशारी 
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व 
आपले चातुर्य ओळखी 
त्याने जणू ठेवल्या होत्या 
मनाच्या आतल्या कप्प्यात 

या महानगरात 
नोकरीच्या धांदलीत 
दोन लोहमार्गाच्या भोवती असलेल्या 
दोन वेगळ्या जगात 
आम्ही पडलो होतो आणि दुरावलो 
पण कधी आठवण झाली 
तर तो हसरा मिश्किल 
चेहरा समोर यायचा 
मदतीस सदैव तत्पर असलेला 
त्याचा स्वभाव आठवायचा 
हा मित्र जिथे असेल तिथे 
नक्की सुखात असणार 
मनातून पूर्णपणे ठाऊक असायचे 
खरतर
पण सुखाला ही दृष्ट लागते 
हे माहीत  होते 
कधी पाहिले नव्हते 
ते पाहिले.
************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...