सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

प्रेम मुर्खता


प्रेम मुर्खता 
******
प्रेम कळावे कळावे 
ऐसे लाखदा वाटले 
माथा आपटला धोंडी 
डोके फुटोनिया गेले 

प्रेम भेटावे भेटावे 
जगभर मी शोधले 
हिंडहिंडोनिया यारो 
गोळे पायात या आले 

प्रेम असते कसले 
कोण खातो रे कशाशी 
गोष्टी ऐकल्या पक्वांन्नी 
जग पाहिले उपाशी 

प्रेम असते फुलांचे 
प्रेम चंद्र तारकांचे 
प्रेम काश्मीर उटीचे
धुंदी भिनल्या गात्रांचे 

असे म्हणतात कुणी 
असे लिहतात कुणी 
मज वाटते आहेत
सारे आत्मसंमोहनी 

जन्म घालणे प्रजेला 
पुढे चालणे वंशाला 
ऐश्या साध्या घटनेचा 
क्लिष्ट गुंता कुणी केला 

चव असते वेगळी 
हर एक स्वभावाची 
तया कशाला ती द्यावी 
उपाधी ती रे प्रेमाची

प्रेम मूर्खांचा बाजार 
फक्त ढोंगी व्यवहार 
नाही ताप वा औषध 
बिना कामाचा आजार 

प्रेम आठवत कुणी 
राधा कृष्णाला भजती 
प्रेमी पाघळत कुणी 
लैला मजनूला गाती 

साऱ्या गोष्टी या पांचट 
सुक्या तोंडी चघळती 
रंभा मेनकेच्या स्वप्नी 
जे का विश्वामित्र होती 

सोडा सोडा बाता या हो 
लक्ष धंद्याकडे द्या हो 
जग अर्धे हे रे वेडे 
नीट डोळ्यांनी पहा हो..

****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...