बासरी
******
माझिया देहाची होऊन बासरी
वसू दे रे मज
तुझिया अधरी ॥
तुझिया श्वासाच्या
मधुर फुंकरी
रितेपणा भरो
स्वर्गीय लहरी ॥
आणिक काहीच
मजला नको रे
तुझिया रुपास
जीव हा जडो रे
तसा तर वेत
हा आहे इवला
पोकळ केवळ
छिद्रांनी भरला
फुंकता प्राण तू
होईल जागता
माझे मी पण हे
मज ये जाणता
तुझीच कृपा ती
केवळ कान्हाई
आणेल मजला
तुझ्याकडे माई
एकाच श्वासाचा
दे एकच स्वर
एकाच स्पर्शाचा
दे स्वर्गीय वर
होईल सार्थक
मग या जन्माचे
अनाथ अनाम
पोकळ वेळूचे
*******
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https:// Kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा