शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

कागदाचे ऋण

कागदाचे ऋण
***********
कागदाचे ऋण 
वाहते जीवन 
अरे तया विन 
सारे उणे ॥

शिकलो अक्षरे 
तयात पाहून 
आकडे घोकून 
पाठ केले ॥

किती चित्रकथा 
वाचल्या सुंदर 
कौतुके अपार
दाटुनिया ॥

जाहली ओळख 
आणि कवितेची 
माझिया प्रितीची 
हृदयस्थ ॥

ज्ञानाचे भांडार 
आणले समोर 
चांगला डॉक्टर 
घडविले ॥

अन मग भेटी 
आली ज्ञानदेवी 
कागद ते दैवी 
अपूर्वच॥

जाहलो आनंद 
रंगून तयात
सुख मूर्तिमंत 
भरलेला ॥

गाथा दासबोध 
कृष्णमूर्ती थोर 
बुद्धादिक येर
मिळविले ॥

गिर्वाण संस्कृत 
आंग्ल नि भाषेत 
गेलो भटकत 
अनिवार॥

कोरेपणी केले
मज ब्रह्मदेव 
कवितेचा गाव 
रचियता ॥

माझ्या जीवनात 
असे हा कागद 
मज अलगद
सांभाळता ॥

सुखात दुःखात 
यशपयशात
जाहला तो देत 
साथ मला ॥

आताही हातात 
धरूनिया हात 
असे मिरवत 
लिहलेले ॥

जर हा नसता 
कागद जीवनी 
विक्रांत वाहनी
व्यर्थ होती ॥

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...