सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

मैत्री

मैत्री 
*****

बऱ्याच वेळा मैत्रीच्या 
या विलक्षण रसायनाकडे पाहतांना 
मैत्री मधील ही गुंतागुंत किंवा 
सहजपणे येणारी एकतानता पाहतांना 
वाटते मैत्री आहे तरी काय?

कधी वाटते 
मैत्री असते गरज 
माणसाच्या मनाची 
भयानक एकाकीपणात 
उतारा म्हणून मिळालेली 
पुडी ही दव्याची

अन एकदा का संपले 
हे एकाकीपण 
सरते गरज या दव्याची 
अन सवे संपून जाते मैत्रीपण

गरज असते देहाला 
कधी मनाला 
संकटात धावायला 
कोणीतरी मदत करायला
आत्ता नसेल पण उद्या पडणार 
त्याला नाहीतर 
तर मला घडणार
म्हणून सावध एक गुंतवणूक 
करतो प्रत्येकजण 
आपल्या आजूबाजूला पाहून 
परतीच्या व्याजाकडे 
आशेने लक्ष ठेवून

आणि तो  विरंगुळा 
आपण आपल्याला 
होत नाही कधी 
म्हणून हा कोंडाळा 
जमा करून सभोवताली
आपण ऐकवतो गाणी 
कविता गझल लावणी 
देतो बार उडवूनी

असु दे रे 
त्यात वाईट काय नाही 
पण मग उगाचच 
आपण आपलीच टिमकी वाजवत
आपण आपल्यालाच मिरवत 
बसायचं हे काही खरे नाही.
यात मैत्री दिसता दिसत नाही

मैत्रीचे नाणं बहुदा चालतच 
कधी कधी खोट असूनही 
भाव खातच .

तर मग काय  मैत्री 
कुर्बानी यारी 
दुनियादारी 
व्यर्थ आहेत का सारी ?
मी कुठे नाही म्हणतो 
मीही फक्त एवढेच म्हणतो 
ती एक गरज आहे 
वाटेवरून चालताना 
सुरक्षतेच एक कवच आहे 

आपण अडकतो 
कधी मित्रात 
त्याच्या भावनात 
आपण जीवनाचा 
भाग होतो त्याच्या 
कधी त्याला करतो 
आपल्या जीवनाचा भाग 
कारण 
तेच जुनं  पुराणं
आणि खरंखुरं

माणूस हा प्राणी आहे 
कळपात राहणारा 
कळप कुठेही असू दे 
प्राणी तो प्राणीच असतो
सहवासात सुरक्षतेचे छत्र शोधतो

बाकी मैत्री तर 
कुणी गौतम बुद्ध करू जाणे 
कोणी कृष्णच निभावू जाणे

मैत्री
काहीही नको असलेली 
फक्त उमलून आलेली 
फुलासारखी 
येणाऱ्या प्रत्येकाला गंध देणारी 
तोडणाऱ्याला 
कुरवाळणार्‍याला 
वा पायी उडवणाऱ्यालाही !

अशी मैत्री खरंच असते का 
या जगात कुठे कधी ?
का हे सारे स्वप्नरंजन आहे 
मानवी मनाचे ?
कुणास ठाऊक 

कदाचित 
जीवनाचे फुल 
संपूर्णतेने फुलन आल्यावर 
उलगडणारा रंग 
प्रकटणारा सुगंध 
अपार स्नेहाचे मधु अंतरंग

त्याचे नाव मैत्री असेलही !!

कवितेसाठीकविता
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...