शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

भय

भय हे कसले 
मनी दाटले
व्यापून उरले 
जीवनाला ॥
भय अंधाराचे 
भय विलया चे 
भय नसण्याचे 
मी उद्याला ॥
अशा भयाचा 
जन्म कुठे तो 
कसा मी होतो 
हे न कळे ॥
का भय आले 
मनी उपजले 
काळा मधले 
सांडपाणी ॥
घडल्या वाचून 
घडणे होऊन 
मनास छळून 
घेते उगा ॥
भय मी पाहतो 
भयात शिरून 
घेतो जाणून 
भय कसे ॥
अहो भय मीच 
काळ होऊन 
जातो हरवून 
दिसे मला ॥
भय पाहता 
भय हरवले 
बागुल बसले 
अंधारात ॥
हसतो विक्रांत 
भय विरहित 
जणू आकाशात 
चंद्र नवा .॥

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...