सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

आरसा

आरसा
*******

दत्त दावितो मजला 
माझ्या मनीचा आरसा 
धूळ भरल्या वासना 
पारा गळल्या लालसा 

दत्त सांगतो मजला 
पुस पुस रे तो बाळा 
निज साधना रुपाने
तया प्रक्षाळूनी जळा

दत्त म्हणतो मजला 
पाही पाही रे तयाला 
ज्याने अंतरात कैसा 
अैसा आरसा ठेवला

दिसे आरसा आरश्या
जरी समोर ठाकता 
रूपे शेकडो अनंत 
थांग लागेना लागता 

मन मना न कळते
मन शोधावया जाता 
मन परावर्ति माया 
होते सहस्त्र फुटता 

सदा मग्न हा आरसा 
खेळी प्रतिबिंबि असा
नसे बिंबाहून तया 
काही अर्थ तोहि तसा 

फोडू म्हणता म्हणता 
नच फुटणार कधी 
जोडू म्हणता म्हणता 
नच जोडणार कधी 

आहे नाही पण त्याचे 
कधी पाहियले कुणी 
दत्त दावितो हसतो 
नाही विक्रांत रे कुणी

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...