मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

चंद्र दिला

चंद्र दिला
********
कुणीतरी कधीतरी 
चंद्र दिला हातावरी 

थरथर स्पर्शातून 
गाणे आले बहरून 

काही शब्द माळलेले 
काही शब्द ओघळले 

गंध होता पाझरत 
कागदाच्या घडीतून

झुकलेले डोळे काळे 
दुमडले ओठ ओले 

भाळावरी रुळलेले 
कुंतल ही लाजलेले

कुणीतरी मन दिले 
काळजात घर केले 

आठवते अजूनही 
संध्यारंग उजळले 

भास होतो मीच मला 
कणकण झंकारला 

तीच मूर्ती काळजात 
लेणे झाली वेरूळात 

युग जरी आले गेले 
क्षण तेच थिजलेले 

म्हणूनिया तुझी प्रीती
उमटते माझ्या गीती

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मिच्छामी दुक्कडम ( जरा अवेळी )

मिच्छामी दुक्कडम (जरा अवेळी ) ****** वळवले दाम ठोठावले काम  मिटे आश्वासन कुठे वर्धमान ॥ तुझाच भरोसा आता तीर्थंकरा उणीव न यावी तु...