शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

माझी माक्याची आई

माझी माक्याची आई 
****************
माया पिकल्या स्पर्शाचे 
गीत काळजात वाजे 
सुरकुतल्या हाताचे 
प्रेम गालावर नाचे 

किती दिस न माहित 
मेघ धो धो कोसळून 
काढी एक एक थेंब 
पिळुनिया गात्रातून 

किती कौतुक डोळ्यात 
होत्या झेपावत लाटा
घेईल कवळून हाती 
हाव मुळी न थांबता

शब्द मिस्कील मधुर 
म्हणे सुनेल नावास
प्रेमे सांगे दटावून 
नको तरासू विजूस

कधी जातांना गावाला 
दिली चवली हातात 
मुद्रा सुवर्णाची तीच 
माझ्या अजून मनात 

पुडे गोल फुटाण्याचे 
सवे शुभ्र चुरमुरे 
सुख लुटायाला सवे 
येत चिमण्या पाखरे 

तीच स्मरते बसली 
चुलीसमोर धुरात 
पीठ काथवटी असे 
एकतानता तयात 

तिचे चालणे लयीत
झपझप राणीगत
तीक्ष्ण नजर बारीक 
हासु रंगले ओठात 

केस पिकले पांढरे 
भांग सरळ रेषेत 
जग पाहिले जिंकले 
जरी जीवन कष्टात

माझी माक्याची ती आई 
स्पर्श मायेचे देऊळ 
गंध रंगल्या पानांचा 
घाली मनात हिंदोळ 
*******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...