रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

शिवरायांची माणसं

शिवरायांची माणसं
*************

माझिया राजाची 
माणसं सोन्याची 
प्रचंड प्रेमाची 
अलौकिक ॥

माझ्या राजाची 
माणसं लोहाची 
दुर्दम्य इच्छेची 
अविचल ॥

आणिक राजा तो 
जणू की परीस 
जिवंत मातीस 
करणारा ॥

आहा ते भाग्याचे 
पाईक सुखाचे 
जाहले तयाचे 
सहकारी ॥

देव देशासाठी 
आयुष्य वेचून 
गेले ते कोरुन  
नाव इथे ॥

विक्रांत तयाच्या 
नमितो पदाला 
वाणितो भाग्याला 
शतवार ॥

अशा राजासाठी 
लाखदा जगावे 
लाखदा मरावे 
इहलोकी ॥

राजे शिवराय 
मला देवराय 
वाणू किती काय 
नच कळे ॥

म्हणून नमितो 
मुजरा करतो 
ह्रदयी धरितो 
सर्वकाळ॥

********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दत्त बडवतो

दत्त बडवतो ********* दत्त बडवतो मज बडवू दे  दत्त रडवतो मज रडवू दे  फटका बसता जागृती येता कुठे जायचे मज कळू दे  ॥१ प्रवाही वाहून ...