बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

उनाड कविता

उनाड कविता
**********

काही उनाड कविता 
येतात माझ्या मनात 
पण मी लिहीत नाही 
बांधून त्या अक्षरात 

येतात अशा धावत 
जातात उगा पळत
सभोवती पदरव 
त्यांचे राहती गुंजत 

सांगा कसे तरंगाना
जावे शब्दात गुंफत 
किणकिणती नुपुरे  
रेखाटावी अक्षरात

त्यांच्या त्या येण्यास कधी 
नसे धरबंध काही 
काळवेळ ताळमेळ 
कधीच बघत नाही 

त्या कधी उगवतात 
गंभीर चर्चा सत्रात 
तणतणत्या बॉसच्या 
डोक्यावरती नाचत 

त्या कधी हुंदडतात 
भर गर्दी बाजारात 
गाडीवर कधी कुठे 
जात असता वेगात 

त्या उनाड असतात 
त्या धमाल करतात 
त्या कधी सतावतात 
त्या कधी हसवतात 

कधी कधी पण खोल 
आत घेऊन जातात 
अन मनास एकटे
तिथे सोडून देतात 

जगणे उनाड होते 
मरणे सुटून जाते 
आकाशाचा तुकडाच
जीवन होऊन जाते 

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...