सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

घर

 घर.
*****
शनिवार ची रात्र झाली की 
सगळे धुवायचे कपडे बॅगेत कोंबून 
मी होस्टेलवरून निघायचो 
सेंडहस्ट रोडला ठाण्याची लोकल पकडायचो 
शनिवारी बहुदा बसायला मिळायचे 
आणि मग ठाण्याकडे प्रवास सुरू व्हायचा 
त्यावेळी खिडकीतून दिसायची असंख्य घरे 
कित्येक चाळी कित्येक इमारती काही झोपड्या
आणि त्या इमारतींच्या इवल्या-इवल्या खिडक्या 
कधीकधी ट्रेन स्लो व्हायची 
अन त्या खिडक्यातून 
दिसायच्या काही हालचाली 
आठ नऊ ची गडबड
मुलांची बडबड
किचनच्या शिट्यांचा आवाज 
एका लयीतील बातम्या कधी गाणी
प्रत्येक खिडकीच्या आत एक घर 
त्या घरात एक संसार 
एक स्वतंत्र जग वसलेले 
कसे आणि कितीपत असतील 
यांचे संबंध 
त्यांच्या भावना त्यांचे व्यवहार 
त्यांचे नातेवाईक त्यांची मित्रमंडळी 
त्यांची स्वप्ने त्यांची मुले 
किती ही सारी गुंतागुंत केवढा हा पसारा
आणि तरीही 
मला जाणवायचे त्यावेळी 
कुणाचाही कुणाला नसलेला स्पर्श 
अच्छेद्य भिंती दुरावलेले मजले
भर सागरात असलेली  ती असंख्य बेटं
अचानक हेही जाणवू लागायचे की 
त्या प्रत्येक घरात मीच आहे 
त्या सुखदुःखांच्या सांगाती 
नाव वेगळे असेल देह वेगळा असेल 
संबंध वेगळे असतील 
पण मी तो तोच आहे.
घर लपेटून बसलेले अस्तित्व .
मग ती सारी अस्तित्व जोडून मला
मी पूर्ण शहर व्हायचो.
*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...