अनंगा
*****
बहु तू अनंगा
आता रंगू दे रे
अवधूत रंगा ॥
जाहलो किती रे
सेवुनिया धुंद
जाई-जुई गंध
निशिगंध मंद ॥
डोळ्यात कुणाच्या
हरवून खोल
शब्दात कुणाच्या
हरपून बोल ॥
स्पर्शी रेशमी त्या
जाहलो बेफान
जाणले पाहिले
यौवनाचे गाण ॥
हाय परी त्यात
आकंठ अतृप्ती
जाळणारी आग
पडती आहुती
विझू देत आता
आवेग तनुचे
पडू देत आता
स्वप्न या प्रभुचे ॥
सोड सोड आता
मनाचे या ठाण
कणोकणी आता
येवो शिव गाण ॥
दग्ध तुला पुन्हा
कोण जाळू शके
अग्नि पोटी तुला
कोण पाहू शके ॥
तूच आता देवा
कृपा करी थोर
माझ्यासाठी होई
नाथ जालंधर ॥
धरुनिया हाता
करी कानिफा वा
गोपीचंदा सम
मार्ग थोर दावा ॥
विक्रांत दारात
तुला आन मागे
रंग भगवा दे
आस मनी लागे ॥
***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा