मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

गिरनार चढत

गिरनार चढत 
***********
प्रत्येक पायरीशी थोडे घुटळत 
प्रत्येक पायरीला हळू कुरवाळत 
जावा गिरनार हळू हळू चढत 

प्रत्येक पायरीवर दत्त स्मरत
प्रत्येक स्पर्शात ऊर्जा अनुभवत 
जावे गिरनारच्या मुळापर्यंत 
आदिम शक्तीशी  तादात्म्य पावत 
 जावा गिरणार  हळूहळू चढत 

त्या पवित्र वृक्षांचे कौतुक करत 
त्यांच्या सावल्यांना धन्यवाद देत 
कातळ कपाऱ्यांना लळा लावत
जावा गिरनार हळूहळू चढत 

ते दत्त जीवलग नवनाथ 
हजारो लाखो संत-महंत 
अगणित प्रेमळ भाविक भक्त 
यांना मनोमन वंदन करीत
जावा गिरणार हळूहळू चढत 

कधी भणाणता वारा झेलत 
कधी कोसळत्या धारात भिजत
थरथरणारे अंग आपलेच पाहत 
जावा गिरनार हळुहळु चढत 

कधी उन्हाच्या रौद्र कहरात 
असताना अंग लाही सारखे फुटत 
वा घामाच्या धारात अखंड नहात 
सुकलेल्या गळ्याला पाण्याने भिजवत 
जावा गिरणार हळूहळू चढत 

आणि पोहचताच गुरु शिखरावर 
सर्वस्व आपले अर्पण करत 
 होऊन अगदी रिक्त रिक्त 
जावे दत्तप्रभुची एकरुप होत

पुढे कृतज्ञता धन्यता ओतप्रोत
 उर्जेने भरलेला देह सावरत 
सार्थकतेने भरले डोळे पुसत
जावे गिरनार हळूहळू उतरत 
***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...