मंगळवार, २६ मे, २०२०

प्रयोजन

प्रयोजन
******
वाटले मला भेटल्या विना तुला
जावे लागते की काय मला
पण तू थांबलेस बहुदा पुन्हा एकदा
आशेचा अन श्रद्धेचा दीप घेऊन
मी चालू लागलो पुन्हा तुझ्या पथाला
तशी इथून जायची मला भिती नाही
भिती नाही काही गमावण्याची ही
माझ्या सकट इथे माझे काहीच नाही
 हे केव्हाच कळून चुकलोय मी
तुझ्या या नाटकात आताशा
मला वेगळे पाहू लागलोय मी
तुझे भेटणे कसे असेल या
कल्पनाही मी करीत नाही
उगाच तुझे चित्र रचून डोळ्यासमोर
दिवसाउजेडी  स्वप्नही पाहत नाही
ये तू रुप घेऊन वा ये  रूपा वाचून
भेट समोर येउन वा रे आत उलगडून 
किंवा ये असा माझ्यातच मी होऊन
 कसे ? काय ? केव्हा ?
सारे तुझ्यावर आहे मी सोपवून
कारण मला माहित आहे
तुच एकमेव माझ्या जगण्याचे प्रयोजन आहे
बाकी सारे चाललेय म्हणून जीवन आहे.
****
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २५ मे, २०२०

कोरोना वार्डात

कोरोना वार्डात
**********

कोरोना वार्डात 
चिंतातुर रुग्ण 
दाटलेले प्रश्न 
मुखावरी ॥
कुणा थोडा ताप 
कुणा लागे धाप 
कुणा नसे झोप 
रात्रंदिन ॥
बाहेरून बंद 
कक्षाचे ते द्वार 
चाले येरझार
आतमध्ये ॥
स्वतःहून साऱ्या 
घराचीच चिंता 
जिवलग चित्ता
सदोदित ॥
परी एकमेका 
देऊनी आधार 
चाले व्यवहार
 सबुरीचा ॥
कोरोनाच्या कथा 
डोक्यात नाचती 
सांभाळावे किती 
मनामध्ये ॥
बेचव ते अन्न 
येई भरपूर 
परी जाई चार
घास आत ॥
त्यात काही होते 
काही चिन्हां विना 
नशिबाने त्यांना 
साथ दिली ॥
इतरांस तेही 
होते सांभाळत 
आणि धीर देत
 वेळोवेळी ॥
परी काही केल्या 
नव्हते सरत 
दिन उलटत 
भरभर ॥
मग दिनमान 
तेही उलटले 
आले ते भोगले 
भोग सारे ॥
थंडावले युद्ध 
रोग ओसरला 
परी तो उरला 
बंदिवास ॥
भयाची सावली 
मिटता उरली 
मनी भरलेली
कृतज्ञता ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २४ मे, २०२०

मृत्यू बीज



मृत्यूबीज
********

जाऊ नका कोणी
कुठे ते बाहेर
प्रकाशी अंधार
दडलेला ॥
कुठल्या श्वासात
मृत्यूबीज आहे
कोणा नच ठावे
अदृश्य से ॥
सारेच स्पर्श
अस्पृश्य आता
मैत्रीच्या ही वार्ता
दूरवरी ॥
जीवाहुन कुणा
असे काय प्यारे
तयाला संभाळे
आतातरी ॥
खाय डाळ भात
भाज्यांचा तो सोस
नको करू खास
काही केल्या ॥
पुढच्या ऋतूत
मिळतील फळे
जर का जगले
शरीर हे ॥
घरात ही होतो
व्यायाम बियाम
केल्याने आराम
मरे न तू ॥
मनास हवेच
असते धावणे
बोलणे खेळणे
सर्वकाळ ॥
तूच तुझा त्राता
होऊ नको काळ
सुखाचे आभाळ
उद्या आहे ॥
विक्रांते पाहिला
मृत्यूचा सापळा
दत्ते चुकविला
कृपा बळे ॥

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २१ मे, २०२०

डोळियाच्या डोळा





 डोळियाचा डोळा
****************

डोळियाचा डोळा 
कुणी पाहियला 
कळला कुणाला 
कधी काय? ॥

शब्दाचा आकार 
ध्वनित साकार 
येई वाऱ्यावर 
पाहिला का ? ॥

चित्र उमटते 
डोळात उलटे 
परंतु सुलटे 
कैसे गमे ?॥

स्पर्श त्वचेवर 
विजेची लहर 
वाचुनिया तार
धावत असे !॥

घडते घटना 
मोडून तर्कांना
शोधुनिया खुणा
सापडेना ॥

तिथे जोडे हात
म्हणून विक्रांत 
सर्वज्ञ श्री दत्त 
दिगंबर ॥

 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, २० मे, २०२०

गिरनारी

गिरनारी
**************
येता गिरनारी 
दत्त सोबतीला 
असतो साथीला 
कळतसे ॥
 जाता परतून 
दत्त सोबतीला 
जीव निवलेला 
जाणतसे ॥
येता गिरनारी 
जीव हा अधीर 
डोळीयात नीर 
दाटलेले ॥
जाता परतून 
सुखाचा अपार 
दाटतो सागर 
अंतरात ॥
घडताच भेट 
होई ताटातूट 
जरी जनरीत 
ठरलेली ॥
भेटीगाठीतून
भक्तीस झळाळी 
करुणा बहाळी 
देत असे ॥
विक्रांत पाहतो 
सर्वव्यापी दत्त 
नित्य  गाठ भेट
हृदयात ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

प्रवास

प्रवास
******

प्रत्येकाचं मरणाचं गाव 
ठरलेलं असतं 
कुणी कधी का मरावं 
याला कारण नसतं.
अन हे जे कारण दिसतं
ते फक्त कारण असतं

येताच ते स्टेशन, 
त्या गावाला 
जीवनाच्या गाडीतून 
गपगुमान उतरून जावं लागतं 
गाडी चुकत नाही 
स्टेशनही हुकत नाही 
मरतो का आम्ही 
मारतो कोण आम्हाला 
खरंच कळत नसतं 

 या गाडीचे तिकीट 
कोण कधी काढतो 
अन अंतराचे गणित 
कोण कसे मांडतो 
सारेच प्रश्न अनुत्तरीत 
सामान्यजनांना 

देव पाहिलेला ही 
उतरून जातो 
देव न पाहिलेला ही 
उतरून जातो 
फरक एवढाच 
त्यांना माहीत असतं 
कधी कुठे उतरायचं 
अन स्वातंत्र्य असतं 
पुन्हा चढण्याचं 

बाकी आम्ही . . 
आम्हाला कुठल्या तरी 
प्रवासात कळतं 
आम्ही प्रवास आहोत ते 
प्रवासाचा आनंद लुटत 
रममान होतो प्रवासात 
प्रवासातील सोबत्यात 
अन उतरायचं नाव काढलं की 
चिडतो ओरडतो वैतागतो 
अन कुणीतरीअपरिहार्यपणे 
उतरून देऊ लागताच 
आकांत करतो 
आकांत करत उतरतो

गाडी निघून जाते 
नवीन गाडीत नवीन होऊन 
मागचे सारे सारे विसरून 
पुन्हा सुरू होतो 
एक प्रवास 
कुठे पासून कुठपर्यंतचा 
माहीत नसलेला 
कदाचित
पुन्हा उगमाकडे नेणारा 
वा पुन्हा रुळांच्या चक्रव्युहात
गुरफटणारा .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

अवघे घडणे





अवघे   घडणे
********

तूच तुझी भक्ती
तूच तुझी वृत्ती
संसार संसृति
घडविली ॥

अंतरी बाहेरी
दाटलेली सत्ता
तुझीच श्री दत्ता
दिसतसे॥

सुंदर साकार
किंवा निराकार
श्रद्धेचा प्रकार
कृपा तुझी॥

तुझे हे स्वरूप
मनास कळते
पाहता दिसते
नटलेले॥

विक्रांत तुझ्यात
तुझिया कृपेने
जाणतो जगणे
प्रेम भरे ॥
******

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १७ मे, २०२०

ऐसा हा गोरक्ष




ऐसा हा गोरक्ष
************


मोहाच्या राज्यात 
मग्न आत्मदेव 
देई त्या आठव
स्वरूपाचा 

ऐसा हा गोरक्ष
करूणा कृपाळ
करतो सांभाळ
जिवलगा 

कुठून आलास 
कुठे ते जायचे 
कल्याण जगाचे 
करताना 

ऐसी जीव सेवा 
शिकवी जनास 
आपल्या शिष्यास 
सर्वकाळ 

सोनियाची वीट 
धरिता मनात 
सोन्याचा पर्वत 
दावितसे 

 
ठसावी निवृत्ती 
ठासून मनात 
करे यातायात 
म्हणूनिया 

सुटुनिया वीट 
घडवी दर्शन
सरे विस्मरण 
झालेले ते 

आणि मातीतून 
घडविले गुरु 
केला अंगीकारू
अवघ्यांचा

जात-पात वृत्ती 
देखिली न डोळा 
भक्तीचीया खेळा 
रंगविले 

दत्त जिवलग 
गोरक्ष प्रकट 
माझे ह्रदयात 
वास करो 

म्हणून विक्रांत
वदे काकुळती 
उतावीळ पंथी 
मिरावया .

**********
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 

पुणे शहर

पुणे शहर ******* सरले मिटले काल पुजियले  माथी मिरवले मातब्बर ॥ जुनाट वाड्यांच्या काल झाल्या चाळी  इमारत ओळी आज उभ्या ॥ नाव गाव ग...