या तीन वर्षांत
गेलो आहे तीन
पर्वातून
पहिले पर्व सोपे होते
जाणणे पाहणे
शिकणे
अन व्यक्ती ओळखणे
हेच मुख्य काम
होते
स्नेह मैत्री आदर यांचा
त्यात सुगंध होता
खरंच ते दिवस
पाखरांचे पंख
लावून आले होते
दुसरे पर्व
जबाबदारीचे होते
खरेतर डोक्यावर
आलेले ते ओझे होते
तरीही त्यात एक
उलगडणे होते
आपण आपल्यालाच
पाहणे होते
स्वत: मर्यादांचे बाहुबल जोखले होते
पण तरीही ते एक वरवरचे
एकटेपणाचे रूक्ष
जगणे होते
माणसात रमणारे
अन् मिसळणारे हे मन
अधिकाराने जखडले
होते
म्हणूनच
टाकतात ते ओझे
वाटले
प्रश्न सुटले
आहेत
पण ते तसे घडले नाही
तिसरे पर्व सुरू
झाले
तेव्हा जगणे नकोसे झाले होते
जिथे फुले वेचली
तिथे गोवर्या वेचने नशिबी आले होते
म्हटले तर
चुकलेच होते
लायकी असूनही
स्वतःला नाकारले होते
मनशांतीसाठी
मध्यम मार्गावर
पाऊल ठेवले होते
पण पदच्युत
राजाचे ते
अपमानित मांडलिक जिणे
होते
बंद करून झाकण प्रज्ञेचे
निरर्थक मान
हलवणे होते
अन् प्रत्येक
दिवस हेच एक
ओझे झाले होते
अखेर बदलाचे शुभ
आशीर्वाद
घेऊन आलेला
मित्र
शुभशकुनांचा
कारणही झाला
अन् या तीन अंकी नाटकाचा अंत झाला
या तीन पर्वात
मी काय कमावले
ते पाहू लागलो
तेव्हा दिसले
माझ्यासोबत फक्त
प्रेम उरले आहे
इवलीसी कटुताही विरून गेली आहे
सहकारी आणि सोबत
यांनी
दिलेल्या
स्नेहाचा प्रेमाचा
आधाराचा अन् तृप्तीचा
एक ठेवा हृदयात उरला आहे
परफेक्ट कुणीच नसतो
मीही नव्हतो
तरीही ते एक शुभंकर सहजीवन होते
कधी पुनवेच्या चांदण्यात भिजणे होते
कधी अवसेच्या आकाशगंगेत हरवणे होते
जीवनातील
गाठीभेटी सुखदु:खे देणेघेणे
पूर्वजन्माचे ऋणानुबंध असतात
कधी सुरू होतात
कधी संपतात
कुणालाही न कळते
पण हे जगणे
सुंदर होते
एवढे निश्चित !!
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे