रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

तुझे येणे




तुझे येणे
*******

तुझ्या ओल्या मृदू केसातून
निथळत असते कृष्ण आभाळ
डोळ्यांनी मी तयास टिपतो
होवून अतृप्त उजाड माळ

तुझ्या कांतीच्या शुभ्र प्रकाशी
मन हरवते जणू चैतन्यात
अन सारे ते तुझे बोलणे  
सजवून ठेवते खोल हृदयात  

कधी माळला मधुर गजरा
द्वाडपणे ये मजला चिडवत
त्या गंधातील अणुरेणूतून  
रेंगाळतो मी तव भवती रंगत

तुझ्या पावूली किणकिणणारी  
पैंजण तुझिया ध्यानी नसती
तू येण्याआधीच दुरूनशी
रव या हृदयास ऐकू येती

येणे तुझे असते उत्सव
वसंतातील मोहर संपन्न
जाणे तुझे प्रतिभेतील या  
विरहाचे क्षितीज कोंदण

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...