रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

पाथेय ..

पाथेय ..

हे सुख दु:खाचे पाथेय
घेवून जगतोय मी
याला वरदान म्हणावे की
शासन म्हणावे मी

या सुखाच्या संवेदना
या दु:खाच्या वेदना
मनामनातून फुटणाऱ्या
अनिर्बंध उसळणाऱ्या
या असंख्य भावना
इतके दिलेस तू
जे कधीच संपत नाही

कोणत्या शिदोरीतून
तू कुणाला काय दिलेस
याचाही पत्ता नाही
अन मला खरेच कळत नाही
काही गरज होती का यांची  

पण पोट तर भरलेच पाहिजे
आंबट तिखट गोड कडू
पर्याय नाही
नाहीतर जगता कसे येईल

बऱ्याच वेळा मी ठरवतो
फेकून द्यायचे तुझे हे गाठोडे
अन घ्यायचे इथलेच स्वच्छेने
जे हवे ते जसे तसे
पण..कळते
मी जे घेतो जे शोधतो  
माझे म्हणून घेतो
ते ही तू दिलेले पाथेयच असते

माझे मला मी अन ...
तुझे तू दिलेले प्राक्तन   
नाकारणे हे सुद्धा !!


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...