रविवार, १२ जुलै, २०१५

नकार नाही होकार नाही..





मला डोळे कळतात
प्रत्येकाच्या मनातील
भावही उमजतात
असे मी समजायचो
अन हे सारे सगळ्यांना
छातीठोक सांगायचो
पण ती भेटे पर्यंतच
कारण नंतर मग..
कशाचे काय नि कशाचे काय
मला डोंबलाचे तिचेच काय
कुणाचेच मन कळत नाही
हे अगदी स्पष्ट झाले


का ती भेटल्यापासून
माझे मनच बदलले
कळण्या न कळण्याच्या
अगदी पलीकडे गेले
कुणास ठावूक पण
ही शक्यताही अगदीच
नाकरता येत नाही .

आपलेपणानं ओथंबून
चमकणारे डोळे
मनावर प्रेमाची सावली
धरणारे डोळे
क्षणोक्षणी अस्तित्व जाणवून
देणारे डोळे
जाता जाता निमिषभर
थबकणारे डोळे
डोळ्यात डोळे मिसळता
उजळणारे डोळे

कीती शोधले पण
कधी दिसलेच नाही
बरे नाहीतर नाही
निदान दिसावेत म्हटले

सदा नाकारणारे थंड
निर्विकार डोळे
पाहूनही न पाहता दूर
वळणारे डोळे
परकेपणाची सीमारेखेत
जखडलेले डोळे
अहंकाराचा फणा ठाम
ठेचणारे डोळे
वा निकाल लावून नीप
तोडणारे डोळे
पण तसेही कधी काही
दिसले नाही मला

ते डोळे भेटायचे रोज
सुप्रभात म्हणत
बोलायचे हसायचे अगदी
फॉर्मल वागत
नकार नाही होकार नाही
आणि पाणी केवळ
राहायचे डूचमळत

वारे आले नाही
बोट हलली नाही
वादळ आले नाही
बोट बुडाली नाही
अश्याच एका दिवसानंतर
ती सुद्धा कधीच आली नाही
मला डोळे कळतात असे मग
मी कधीच म्हटले नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...