सोमवार, १३ एप्रिल, २०१५

माउलीचे मन धाले...






 (मृत्यू शय्येवरील जीवाचा प्राण जीवलगच्या भेटीसाठी कसा ताटकळतो हे मागील आठवड्यात आयसीयुत प्रत्यक्ष पाहिले त्याची ही कविता)



तपासण्या औषधांची
साऱ्या पराकाष्टा झाली
खूप यत्न करूनही
म्हातारी कोमात गेली

जीवघेणा रोग होता
कणकण थकलेला
सुडोमोनी जंतू होते
मृत्यू अन ठरलेला

यातनेत भरडला
कसाबसा टिकलेला
लाडकीला पहायाला
प्राण होता थबकला

उपचार थकलेले
चालू होते चाललेले
ठोके श्वास मंद होते
हृदयही थकलेले

परी जीव घोटाळला
कान प्राण आतुरले
लेक तिची दूर देशी
निरोपाचे दूत गेले

दहा दिस मावळले
मरणाला रोखलेले
भीष्म तन होते जणू
सुयांमध्ये खिळलेले

आणि मग एकदाचे
लेकीचे वाहन आले
कानापाशी स्फुंदत ती
कशीबशी तिला बोले

उघड ग डोळे आई
बघ दुरुनिया आले
लाडक्या या पाडसांना
घेवूनीया सवे आले

मिटलेल्या डोळ्यात त्या
काहीतरी चमकले
अडकले प्राण मग
मिनिटांत निसटले

ऐकण्याच्या पलीकडे
होते तिने ऐकियले
भेटण्याची आस होती
माउलीचे मन धाले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...