बुधवार, ३० जानेवारी, २०१३

ती आली पुन्हा


ती आली पुन्हा
आज अचानक
हवेच्या झुळकी गत
मनी गारवा
एक हवासा
हलका पसरवत
रूढ रोकडा
होता व्यवहार
थोडी ओळख त्यात
कसे काय ते
बोलही वरवर
झाले न झाल्यागत
कितीतरी पण
वर्षानंतर तार
थरथरली आत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



सोमवार, २८ जानेवारी, २०१३

कवी ज्ञानोबाची बाळे







नटुनिया विभ्रमांनी
कविता ही पानोपानी
नाद लय रंगातुनी  
पिंगा घाली माझ्या मनी ll ll 
संगे हसुनी खेळूनी
कधी रडूनी झुरुनी
भान अवघे सुटुनी
आलो आनंद भुवनी ll ll 
शब्द नवीन जुन्यांचे
कधी तुमचे नि माझे
शब्द गूढ अनवट
सोपे सरळ सोट ll ll
हात घालूनिया हाती
जेव्हा नवे रूप घेती
अर्थ धुमारे फुटती
नव्या पाहता दृष्टी ll ll
अहो शब्दाचिया बळे
कवी ज्ञानोबाची बाळे
धन्य तया स्फूर्तीलागे
वर चिरंजीव मागे  ll ll


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २६ जानेवारी, २०१३

झाड आणि वस्ती







एक सुंदर झाड होते.

उंचच उंच गर्द पानांचे

फळांनी लगडलेलं

किलबिल करणाऱ्या

पाखरांनी अन घरट्यांनी

अवघे भरून गेलेलं.

शिकारी प्राण्या पासून

खूप सुरक्षित असलेलं.

म्हणून मग

त्या झाडावर हळू हळू

नवीन पाखर येवू लागली

घरटी बांधून राहू लागली

सुरवातीला त्याचे कुणालाच

काही वाटले नाही

हळू हळू पण फांद्या

कमी पडू लागल्या

बेचक्या तर उरल्याच नाही .

तरीही झुंडी मागून झुंडी

पाखर येतच राहिली

एव्हाना त्या झाडाजवळ

ससाणे साप व्याधही

काही वावरू लागले

पण जगण्यासाठी ते झाड

खूपच सोयीस्कर होते

म्हणून ती पाखर तरीही

तिथेच राहू लागली

पण ते झाड आता

अस्ताव्यस्त दिसू लागले

जागा कमी पडू लागली

काही स्वार्थी पाखरांनी

बुंधा फांद्या टोकरून

नव्यांना जागा करून दिली

मोबदल्यात

भरपूर कीड खाल्ली .

त्यामुळे झाड खचू लागले

खुरटू लागले

ते पाहून झाडावरची

जुनी जाणती गोळा झाली

अन त्यांनी फर्मान काढले

सारी नवीन घरटी

तोडण्यात यावीत

खूप भांडण पाखरात

खूप लढाया झाल्या

अन शेवटी त्यावरही

एक तोडगा निघाला

अमुक काळा नंतरची

घरटी पाडण्यात यावीत

काडी काडी गोळा केलेलं

एकेक घरट मग

उध्वस्त होऊ लागलं

भरपावसात भिजलेली पिलं

पंखाखाली घेवून

पक्षीण आक्रोश करू लागली

कीड खावून फुगलेली पाखर

आपल्या उंच घरात

गुपचूप बसून राहिली

पावूस पडतच होता

मोडलेल्या घरट्यांची

काडीन काडी वाहवत होता



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/






रविवार, २० जानेवारी, २०१३

जे बुध्दा होते कळले





कळेल काय मज ते

जे बुध्दा होते कळले  

हसुनी गुरु यावर    

जरूर मज वदले  १

त्याआधी पण झाडांशी

तुज पाहिजे बोलले 


अन गीत चांदण्यांचे

हवे उगाच ऐकले   २

  

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/


पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...