बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६

संजय तिकोणे सर (सेवापूर्ती दिना निमित्त )


संजय तिकोणे सर ( सेवापूर्ती दिना निमित्त )
***********************

तिकोणे सर म्हणजे माझा लहान भाऊ संजय !
 संजयला आम्ही भावंडं  संजू म्हणतो . . 
आम्ही चार भावंड त्यामध्ये ,
माझा नंबर दुसरा तर संजय चा तिसरा आहे .
त्याच्यात माझ्यामध्ये जेमतेम 
दोन वर्षाचे अंतर 
त्यामुळे लहानपणापासूनच 
आम्ही एकमेकांचे हक्काचे खेळगडी होतो 
आमच्या शालेय जीवनात 
आम्ही अनेकमेकां सोबत 
भरपूर खेळलो ,खूप मस्ती केली ,
हिंडलो फिरलो भटकलो

 पुढे त्याचा ग्रुप माझा ग्रुप 
थोडाफार वेगळा झाला तरी पण 
गल्लीतील क्रिकेटचा 
तो माझा कायमचा पार्टनर होता

आता त्याच्या स्कूलच्या 
शेवटच्या दिवशी 
तुमच्या सरांना अभ्यासाचा कंटाळा होता 
हे सांगणे बरे नाही 
तो खरे तर बुद्धीमान होता.
पण त्याचे मन पुस्तकात रमत नसे हे खरे .
बाहेरची जग त्याला जास्त आवडायचे 
बाहेरच्या उलाढाली मित्रमंडळी 
लोक व्यवहारात त्याला जास्त मजा यायची .
त्याशिवाय घरातील आईची कामे 
तो मन लावून करायचा .
 खरंतर माझ्यापेक्षा 
तोच आईचा जास्त लाडका होता . 
तो आईच्या मदतीला सदैव हजर असे
विशेषतः बाहेरची कामे करणे . 
बाजारतून वस्तू आणणे .
जिनसा गोळा करून देणे 
व इतरही छोटी मोठी कामे 
तो आनंदाने करत असे. 
याशिवाय घरातील इलेक्ट्रिसिटीची कामे 
वां मेकॅनिकल वर्क यात 
त्याला खूपच रस होता 
थोडक्यात तो आईचा 
एकदम गृहकर्तव्यदक्ष मुलगा  होता 
पुढे त्याचा  हा गुणधर्म  पती आणि पिता 
या भूमिका निभावतांना अधोरेखित झाला .
त्याचा या  स्वभावाचा 
मला मात्र एक तोटा  झाला  
तो म्हणजे म्हणजे
"संजू भाऊ किती काम करतात ते बघा 
नाहीतर तुम्ही."
असे टोमणे तर मला त्याच्या वहिनी कडून 
आयुष्यभर झेलावे लागले आहेत .
कारण मी पुस्तकी किडा 
व मला बाहेरच्या जगाचा
 विलक्षण कंटाळा होता 
आणि त्याला आवड होती
   
 तो ही अजून तसाच आहे 
आणि मीही अजून तसाच आहे 

पण त्याच्यात असलेली प्रचंड एनर्जी 
उत्साह कष्टाळूपणा हे खूप कौतुकास्पद आहे 
(खरं तर आमच्या आईचा गुणधर्म 
त्याच्यात उतरला आहे) 
तो कधी थकत कसा नाही? 
त्याला कंटाळा कसा येत नाही?
याचे मला सदैव नवल वाटते

तसेच त्याचा नोकरीमधील कामसुपणा 
प्रामाणिकपणा , शिस्त, नियमितता 
सगळ्यांना मदत करण्याचा स्वभाव 
आणि सर्व विद्यार्थांना  
समदृष्टीने पाहण्याची प्रेममय तटस्थता 
हे गुण मला माहित आहेत .
त्याच्या मुळात हळव्या स्वभावामुळे 
त्याला रागही पटकन येतो . 
पण त्या रागा पाठीमागे 
काळजी प्रेम करूणा हितैषूवृती असते .

एकंदरी या नोकरीत त्याने 
प्रचंड धावपळ केली .खूप प्रवास केला .
 विद्यार्थ्यांना शिकवताना पूर्ण योगदान दिले
घर संसार सांभाळताना  
मुलींचे शिक्षण ही व्यवस्थित पार पाडले .
या त्याच्या प्रवासात  
त्याच्या सहधर्मचारणीचा 
सौ सुकेशनिचा तेवढाच मोठा हिस्सा आहे 
हे मान्य करावेच लागेल

त्याच्या खूप आठवणी 
अनेक घटना प्रसंग 
माझ्याकडे खच्चून भरल्या आहेत 
माझ्या बालपणाचे चित्र
 त्याच्याशिवाय अपुरे आहे .

त्याने मला व मी त्याला कधी 
आय लव यू ब्रो किंवा 
आय डू केअर अबाउट यु 
असे म्हटले नसेल 
एकमेकांना ग्रीटिंग वा ग्रीटिंग कार्ड दिली नसेल
 पण एकमेकांविषयीचे 
प्रेम काळजी सदिच्छा जिव्हाळा .
आम्ही सदैव हृदयात जपला . 
आमच्या पिढीची ही पद्धत आहे . 
ती तशीच राहील .

त्याला निवृत्ती दिवसानिमित्त 
पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 
तो सदैव सुखी समाधानी आनंदी आणि
 निरोगी राहावा
हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

डॉ. मनीष दोशी Dy MS (I/C)राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)


डॉ. मनीष दोशी Dy M.S.(I/C) राजावाडी हॉस्पिटल (निवृती दिना निमित्त)
*****************
खरे जे डॉ .मनीषला ओळखतात 
त्यांना सांगायची गरज नाही की
डॉ.मनीष, हे किती विलक्षण व्यक्तिमत्व आहे ते
खरेच ते एक वेगळेच रसायन आहे
पण या विशेष प्रसंगी 
आणि मैत्रीच्या प्रेमाखातर
मी थोडी  उजळणी करतो
  
जो एकदा मनीषला भेटतो
पाहतो बोलतो
त्याच्या मनाला डोळ्याला कानाला 
त्याचे वेगळेपण जाणवते राहते
त्याची एक छाप मनावर पडते .

ते व्यक्तिमत्व, 
जणू काही म्हणत असते
तुम्ही माझ्याशी मैत्री नक्कीच करू शकता !
हवेतर तुम्ही माझ्याशी वैरही करू शकता...
पण मला टाळू शकत नाही ;
माझ्यापासून पळू शकत नाही .

कदाचित मी तुम्हाला आवडू शकेल 
कदाचित न आवडू शकणार नाही
पण तुम्ही मला नाकारू शकत नाही.

कदाचित माझे म्हणणे तुम्हाला पटू शकेल 
अथवा पटू शकणारही नाही 
पण ते चूक आहे 
असे तुम्ही म्हणू शकणार नाही.

 या आगळ्यावेगळ्या,आणि 
दुर्मिळ व्यक्तिमत्वाच्या
तुम्ही जितके जवळ जाल 
तितके तुम्हाला कळून चुकेल की 
हा एक लखलखता हिरा आहे 

या हिऱ्याला आहेत असंख्य पैलू 
त्याला आपण जेवढे नीट निरखून पाहू
तसे ते गुण आपल्याला दिसू लागतात 

मनीषच्या सोबत राहू लागल्यावर 
त्याची मते  आणि विचार कळू लागल्यावर 
त्याचाशी चर्चा करू लागल्यावर 
कळले, की त्याने असंख्य गोष्टींचा 
अत्यंत तर्कशुद्ध, सूक्ष्म आणि प्रामाणिक 
अभ्यास केलेला आहे. 

डॉक्टर म्हणून 
मनीष बद्दल काय  बोलू,
तो माझा अत्यंत आवडता
 "डॉक्टर साथीदार "आहे
कॅज्युलटीत आणि ओपीडीत 
तो माझा पार्टनर असायचा.
 त्याचे सूक्ष्म निरीक्षण, अचूक निदान 
आणि कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ,
हे गुण वादातीत आहेत.

कारण कुठलीही एमर्जन्सी 
हाताळायला लागणारे ; 
 updated वैद्यकीय ज्ञान  
त्याच्याकडे असायचे.
अन् तो कुठलीही 
emergency procedure 
सहज पणे करायचा 

त्यामुळे तो सोबत असेल तर 
कसलाही रुग्ण कुठलीही आणीबाणी 
आली तरी टेन्शन यायचे नाही

तो  कधी शब्दात बोलला नसेल 
पण रुग्णसेवा ही त्याच्यासाठी 
परमेश्वर सेवा होती 

एम.टीआगरवालच्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे 
ए मो आणि सीएमओ जोड्या 
वर्षानवर्षं  फिक्स असायच्या
माझ्या अगोदर मनीष चा पार्टनर 
डॉ शरद पिचड होता.
पण त्याचे प्रोमोशन  झाले 
व सुदैवाने मी मनीष सोबत गेलो.
(किंबहुना या एका आवडत्या मित्रांने 
 दुसरा आवडता मित्र  गाठून दिला. )
हे मैत्रीचे मोठे उपकारच आहेत.

तर अग्रवाल हॉस्पिटलमध्ये 
मनीष बहुतेक करून कॅजुल्टी नाईट करत असे
आणि मी एममो ड्युटी करत असे

या ड्युटीचा एक फायदा म्हणजे 
रात्री पेशंट कमी झाल्यावर
मनीषबरोबर खूप वेळ बोलायला मिळत असे 
आणि त्या चर्चा खुपच गहन 
आणि विचारांना चालना देणाऱ्या असायच्या
त्यातून एक विलक्षण समाधान मिळायचे
(कदाचित नंतर शांत झोप लागायला 
तेही एक कारण असेल)

आणि सहकारी म्हणून त्याचे 
किती कौतुक करावे 
तो मदतीला सदैव तत्पर असे
एखाद्या डॉक्टरने काम केले नाही
किंवा तो डॉक्टर ओपिडी तून उठून गेला 
नंतर आलाच नाही  
त्याची मनीषने कधीही तक्रार केली नाही
त्याने कधीही नावे  ठेवली नाही .
अन् कामात हातही आखडले नाहीत
खरतर इतरांपेक्षा  काकणभर अधिक काम 
तो करायचा .
रुग्णालय त्याच्यासाठी विस्तृत कुटुंब होते.

त्याचे मला जाणवलेले 
आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे
तो तो एक उत्तम सल्लागार आहे.
त्याचा सल्ला नेहमी तटस्थ नेमका 
आणि सर्व बाजूचा विचार करून दिलेला असायचा.
 
मनीष हे चतुरस्त्र ज्ञान असलेले
बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे 
त्याचे जनरल नॉलेज अफाट आहे 
हिंदू अन् जैन धर्माचा व्यासंग अफलातून आहे
तत्त्वज्ञान पुराण ,ध्यान आणि धारणा वर
त्याचा अभ्यास सूक्ष्म आहे  
खरच कौतुक केल्याशिवाय राहत नाही .
तो बोलू शकतो तुमच्याशी सविस्तर पणें 
रुग्णालयाच्या अडचणीवर
कामगारच्या प्रश्नावर
वरिष्ठाच्या मर्यादावर
एवढेच नव्हे तर
समाजकारण  अन राजकारणावरही

ज्याची मैत्री जीवनात वरदान आहे
असा तो मित्र आहे
असा गुणी मित्र असल्याबद्दल
 मला  स्वतःचा अभिमान आणि गर्व वाटतो
 
मनीष बद्दल आणखी एक बोलायचे म्हणजे 
त्याचे हस्ताक्षर खूपच सुंदर आहे 
त्याच्या लिहिण्यात कधी गिचमिड नसते
कुठेही  खडाखोड नसते .
अगदी तसेच त्याचे व्यक्तिमत्व आहे 
सरळ, सुंदर, टापटीप, शिस्तप्रिय आणि देखणे !

तसेच त्याचे चारित्र्य सुद्धा
निर्लेप निर्दोष सरळ 
नाकासमोर चालणारे आहे.
त्याच्याशी बोलताना जाणवते
तो एक अतिशय कुटुंब वत्सल माणूस आहे 
तो एक आदर्श मुलगा आहे 
आदर्श पती आहे 
आणि आदर्श पिताही आहे .

शेवटी आपलं कुटुंब हेच 
आपलं जीवन आणि जगणं असतं 
हे सूत्र त्याला परफेक्ट कळले आहे. 
त्यामुळे त्यांच्या सुखासाठी 
त्याने वेचलेले अपार कष्ट 
डोळ्यासमोर उभे राहतात 
आणि मनात कौतुक उमटते

जर देवाने माझ्यावर 
काही ठराविक मित्रच सोबत ठेवायची 
जाचक अट लादली तर
त्या मित्रांमध्ये मनीषचे स्थान 
खूप वरचे असेल यात शंकाच नाही 
मनीष सारखा मित्र लाभल्याबद्दल
मी परमेश्वराचे खरंच आभार मानतो 
आणि आज त्याच्या सेवापूर्ती दिनानिमित्त 
त्याला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य लाभो 
ही प्रार्थना करतो

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

 

रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

स्वीकार

स्वीकार 
*******
करी रे स्वीकार माझा मायबापा
आगा दयारूपा माझे म्हणा 

नाही भोळी भक्ती नाही शक्ती मती 
परी उपरती खरी असे 

व्यर्थ माझे यत्न निरर्थ जीवन 
घेई रे ओढून कृपाकरा 

कळेना लायकी दत्ता माझी काय 
दिसेनात पाय का रे तुझे 

भाग्यविधाता तू लिही माझे माथा 
ठेवण्यास पदा योग्य करी

माझ्या स्मरणात रहा सर्वकाळ 
श्वास जपमाळ होऊनिया
 
विक्रांता पायीचा करी रज:कण 
भक्तीचा देऊन स्पर्श तुझ्या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

संसार

संसार
****
संसार सरेना भोगणे ठरेना 
जगणे पुरेना उपाधीला

 एक तुटताच नवे उभे शिर 
ऐसा कारभार वासनेचा 

तेच जगी ताट तेच जगी पोट 
येईना रे वीट जीवनाचा 

इंद्रिय कौतुके किती ही लाळावी
भजनी वाळावी वृत्ती किती

आगा दत्तात्रेया येऊनिया भान 
जाते विसरून पुन्हा पुन्हा 

दगडाची रेघ मार मनावर 
नाम तयावर कोर तुझे

विक्रांता करी गा चिरा पायरीचा
खांब वा दारीचा तुझ्या प्रभू

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

धिंडोरा

धिंडोरा
******
तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा   
दत्त दिगंबरा पानोपानी ॥

पाहिल्यावाचून  वर्णीतो रूपाला
गातसे कीर्तीला जागोजागी ॥

तुझिया कृपेचा देतो भरवसा 
पल्लवीत आशा करूनिया ॥

भरल्यावाचून माझी रिती झोळी 
करतो दिवाळी साजिरी मी ॥

मागे बहुतांची फळली रे भक्ती 
तया दत्त प्रीती फळा आली ॥

त्याच कथा गोड जीवी ठसवितो 
दास म्हणवतो आशेने मी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

उपाधी

उपाधी
*****"
जडू नये कधी  ज्ञानाची उपाधी 
अभिमान नदी बुडू नये

भार पुस्तकांचा घेवू नये माथा
तेच शब्द वृथा बोलणारा 

आत्म विस्मरण हेचि रे अज्ञान 
गाठी एक शून्य बांधलेले

जरी व्हावे वाटे काकडा पेटता
पथ हा धुंडता अंधारात 

परि ते कौतुक जातसे जळून
वाटाडया वाचून आडरानी

करी सोडवण तुझी तू यातून .
आपल्या आपण समजून

उगा नको शोधू व्यर्थ रानोमाळ 
गळ्यातील माळ विसरून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

विनायकास मागणे

मागणे
*******

गुणाकार मन माझे गणाकार व्हावे आता 
अहंकार भंग करी देवा तुच एकदंता ॥

देह बुद्धी नको आता मागणे हे वक्रतुंडा 
संत संग देई सदा सांगणे हे शिवसुता॥

काम क्रोध वारुनिया शुद्ध करा भालचंद्रा 
मोह लोभ मत्सरादी गिळून घ्या लंबोदरा ॥

प्रीत तुझी लाभू दे रे सदोदित गजवक्रा 
तारी मज संकटात तू सदा विघ्न राजेंद्रा ॥

कालभय नको आता वारी वारी गजानना 
पाप ताप भय चिंता दूर करी धूम्रवर्णा ॥

सर्व काळी सर्व ठाई विघ्नहर्ता तुच देवा
भयास भय दाखवी रुप तुझे विकटमेवा ॥

चिंतामणी नाव तुझे सार्थ असे गणपती 
मागतो मी ज्ञान भक्ती विनायका तुजप्रती ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

करी पावन

करी रे पावन  ******" करी रे पावन दत्ता माझे मन  भक्तीत भिजून  जावू दे रे ॥ आणिक ते नाही मागणे मनात  राही जीवनात भरूनिया ॥ न...