******
उध्वस्त मनाच्या भिंती सावरीत उभी असतात घरं
हिशोबी व्यवहारी देण्याघेण्यात
वावरत असतात घरं
तुटून पडावं असं वाटत असतं
पण पडता येत नसतं
उघड्यावरचं जगणं तसं सोपं नसतं
करकचून बांधून स्वतःला
बंदीस्त असतात घरं
निरुपाय असतो
कधी तिचा तर कधी त्याचा
हजारो आक्रोश विरहाचे
शेकडो पेले प्रतारणेचे
रिचवत असतात घरं
सूर जुळत नसतात
ताल जमत नसतात
गदारोळात वैफल्याच्या
कान किटत असतात
तरीही घट्ट लावून खिडक्या
खितपत राहतात घरं
अशी थडगी हजारो
सजत असतात रोज
चढाव्याच्या चादरीखाली
मिरवत असतात घरं
दफन कोण झाला इथे
कुणा फरक पडत नसतो
क़ब्रिस्तान ही स्वतःला
समजत असतात घरं
🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .