रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

उध्वस्त घरं


घरं
******
उध्वस्त मनाच्या भिंती सावरीत 
उभी असतात घरं 
हिशोबी व्यवहारी देण्याघेण्यात 
वावरत असतात घरं 
तुटून पडावं असं वाटत असतं 
पण पडता येत नसतं 
उघड्यावरचं जगणं तसं सोपं नसतं 
करकचून बांधून स्वतःला 
बंदीस्त असतात घरं 
निरुपाय असतो 
कधी तिचा तर कधी त्याचा 
हजारो आक्रोश विरहाचे 
शेकडो पेले प्रतारणेचे 
रिचवत असतात घरं 
सूर जुळत नसतात 
ताल जमत नसतात
गदारोळात वैफल्याच्या 
कान किटत असतात 
तरीही घट्ट लावून खिडक्या 
खितपत राहतात घरं 
अशी थडगी हजारो 
सजत असतात रोज 
चढाव्याच्या चादरीखाली 
मिरवत असतात घरं 
दफन कोण झाला इथे 
कुणा फरक पडत नसतो 
क़ब्रिस्तान ही स्वतःला 
समजत असतात घरं 
🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

अनर्घ्य

अनर्घ्य
******
दत्त आगीचा पर्वत दत्त दर्याचे उधाण 
दत्त वनवा कृपेचा घेत असे रे गिळून 

दत्त नाही पोरखेळ कुणी जाता जाता केला
दत्त संपूर्ण सतत जन्म पणाला लावला 

दत्त समर्पण फक्त नाही नवस सायस 
दत्त निरपेक्ष भक्ती दत्त पेटलेली आस 

दत्त नाही लडिवाळ उगा रंगलेला खेळ 
दत्त पेटलेली धूनी तप त्याग सर्व काळ 

दत्त दावी कधी कुणा स्वर्ग वैभव तुकडे
त्यात रमती फसती मूर्ख अजागळ वेडे

रत्न फेकून अनर्घ्य गळा बांधती कोळसे 
भाग्य महासुखराशी तया कळणार कैसे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

घडव जगणे

घडव जगणे 
*********

घडव जगणे माझे दत्तराया 
रोग भोग माया हरवून ॥

तुझिया पायीचा करी रे सेवक 
भक्तीचे कौतुक दावुनिया ॥

यावी क्षणोक्षणी तुझी आठवण 
तयाविन मन हलू नये ॥

झिजो माझी काया तुझ्या भक्तीसाठी 
नको आटाआटी व्यवहारी ॥

ठेवील तू तैसा राहीन मी दत्ता 
नुरो देई गाथा भिन्नत्वाची ॥

जळणे विझणे नसे दीपा हाती 
पाजळणे ज्योती पेटविल्या ॥

तैसे कर्म घडो तुवा ठरविले 
शून्य असलेले माझेपण ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

वेडे

वेडे
*****
त्या वेड्यांनी उगा वेचले 
आयुष्य देशासाठी आपले
चूड लावूनी घरदाराला 
उगाच फासावरती चढले ॥१

बलिदानाची  गोड फळे ती
खात आहेत भुजंग विषारी
 रक्तावरही जे घेती टक्के
होऊन बनेल सत्ताधारी ॥२

उगाच करती आवाज मोठा 
गोळा करूनी चिल्ली पिल्ली 
बिनकामाचे सैन्य जमवती
मने पेटली द्वेष आंधळी ॥३

प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा 
पैसा देव ज्याला त्याला 
लुटा प्रजेला लुटा देशाला 
इकडेतिकडे खुशाल उधळा ॥४

आम्ही आपले बिळात लपतो
जगतो केवळ उगाच जगतो 
घाणीच्या या डम्पिंग मध्ये 
कपडे फक्त आपले जपतो ॥५

आणि काही उरात कढले 
अश्रू डोळ्यामधील पुसतो 
खंत खरी असते तरीही 
हळहळीतच आपुल्या मरतो ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

मी दत्त गीत गातो

दत्तगीत गातो
*************
दत्तप्रिय होण्या मी दत्तगीत गातो
प्रेम वाढवतो मनातील ॥१

शब्दाच्या गाभारी शब्द उधळतो 
प्रेमे ओवाळीतो अवधूता ॥२

जमवून शब्द दत्ता सजवितो 
आणिक मागतो हेचि दान ॥३

इवल्या साधने होई गा प्रसन्न 
होऊनिया मन राही माझे ॥४

चालवी या मना वदवी वदना 
मिटो माझेपणा मायामय ॥५

मागावया श्रेष्ठ काय अन्य इथे 
तयाहून गोमटे नाही जगी ॥६

विक्रांत खेळणे दत्त हातातले
सूत्रे चालवले उरो फक्त ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

अश्रू

अश्रू (उपक्रमा साठी)
*****

आज-काल डोळ्यात या
अश्रू मुळी येत नाही 
हरवल्या भावना का
काहीच कळत नाही

काय झाले मनाचे या 
स्वप्न खोटी वाटतात
दया प्रेम  करुणा हे
शब्द फोल भासतात 

मरतात बालके ती 
युद्धात होरपळूनी
जळतात तरुवेली 
आग ती लावुनी कुणी

कत्तलीला राजरोस 
धर्म रूप देते कुणी
कलेवर कोवळी ती 
घेतात ओरबाडूनी 

तरीसुद्धा मनात या 
न येते दुःख दाटूनी
चालणार जग असेच 
जणू येतसे कळूनी

पेटूनी रक्तात क्रोध
येतसे कधी भरुनी
परी होत हतबल 
जातसे व्यर्थ विझुनी 

निष्टुरता जगताची 
सांगतोच इतिहास
आटतात डोळे मग
होवून उगा उदास 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

ठसा (CLHIV)

ठसा (CLHIV)
************
मृत्यूचा ठसा देहावर उमटूनही 
जन्मलेले जीवन 
हसते प्रसन्नतेने खेळते आनंदाने 
जगते सुखाने 
कारण तो ठसा म्हणजे 
नसते मरण 
इथे असते केवळ जीवन
कालातीत 
या क्षणात संपूर्ण 
थोडीशी इच्छा थोडे नियोजन
थोडी औषध थोडेसे विज्ञान
येते मदतीला अन्
विरत जातो तो शापित ठसा 
जणू नसल्यागत नगण्य होत 
वेगळी असतात तिथली आव्हान 
दुःखही येतात सावली होऊन 
अन् मर्यादा आखून 
नियम पाळून 
जगावे लागते हे ही खरे 
पण एक चैतन्य भरले
संपूर्ण जीवन असणे हातात   
याहून श्रेष्ठ गोष्ट 
कुठलीच नाही जगात 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...